NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ म्हणाले, “नियुक्ती झाली असं वाटत नाही”
मुंबई (प्रतिनिधी) : सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीही आलबेल नसल्याची चर्चा सुरू आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावरून प्रशांत किशोर यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा असून, प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्लाही त्यांनी दिल्याचं सांगितलं जात आहे.

विशेष म्हणजे, या भेटीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही प्रतिक्रिया दिली होती. “मी आठवेळा महाराष्ट्र उलथापालथा केला आहे. राज्याचा कानाकोपरा मला माहिती आहे. ते रणनीतीकार असतील, पण ते आमच्या पक्षासाठी काम करतात की नाही, याची मला माहिती नाही,” असं सुनील तटकरे यांनी म्हटलं होतं.
सुनील तटकरे यांनी प्रशांत किशोर यांच्या भेटीवर बोलताना अजितदादा आणि इतर नेत्यांसोबत काम केल्याचं सांगितलं. “मी माझ्या आयुष्यात निवडणुकीचा सर्व्हे कधीही केला नाही. मला अशा रणनीतीकारांची किंवा सर्व्हेची गरज नाही. मी फिल्डमध्ये काम करणारा आहे. गावातील लोकांना आणि तरुणाईला भेटल्यानंतर मला अंदाज येतो. मी आठवेळा महाराष्ट्र उलथापालथा केला आहे,” असं तटकरे यांनी स्पष्ट केलं होतं.
तसेच, प्रशांत किशोर यांची पक्षात नेमणूक झाली असती, तर त्याची माहिती आपल्याला असती, असंही सुनील तटकरे यांनी म्हटलं होतं. आता यावर मंत्री छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीबाबत छगन भुजबळ म्हणाले, “प्रशांत किशोर भेटले असतील, आम्हालाही भेटतात. मात्र, त्यांची राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आहे, असं मला वाटत नाही. नवीन म्हणून त्या उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना येऊन भेटले असतील. त्यांच्याशी चर्चा केली, त्यात मला काही वावगं वाटत नाही.”
दरम्यान, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे सध्या दिल्लीमध्ये लोकसभा आणि राज्यसभा अधिवेशनामुळे व्यस्त आहेत. त्यामुळे ते मुंबईतील देवगिरी बंगल्यावर कदाचित जाऊ शकले नसतील. “माझ्या माहितीप्रमाणे मागच्या आठवड्यात ही भेट झाली आहे. त्याची चर्चाही झाली आहे. एखाद्या विषयावर फोनवरूनही चर्चा होत असते. त्यामुळे याला एवढं काही गंभीर घेण्याची गरज नाही,” असं स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिलं.
दरम्यान, सुनील तटकरे यांनी कुठल्याही राजकीय सल्लागाराची गरज नसल्याचं मत व्यक्त केलं आहे. यावर भुजबळ म्हणाले, “त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. सुनेत्रा पवार या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. त्यामुळे त्यांनी कोणाला भेटायचं आणि कोणाला भेटायचं नाही, हे त्या ठरवतील ना. त्यासाठी त्यांना आमच्या परवानगीची गरज नाही.त्यामुळे प्रशांत किशोर यांची राष्ट्रवादीच्या राजकीय सल्लागारपदी नियुक्ती झाली आहे का, याबाबतची चर्चा सध्या कायम आहे.




