आदमापुरातील बाळूमामा भंडारा उत्सवा निमित्त वाहतूक मार्गात बदल
गारगोटी (प्रतिनिधी) : आदमापूर (ता. भुदरगड) येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सद्गुरू बाळूमामा यांचा वार्षिक भंडारा उत्सव व अमावस्या यात्रेनिमित्त यंदाही लाखो भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने पोलिस प्रशासनाने ५ दिवसांसाठी वाहतूक बदलाचे आदेश जारी केले आहेत.

१५ मार्चल सकाळी ७ पासून ते १९ मार्चला रात्री १२ वाजेपर्यंत आदेश लागू राहणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सुमारे ८ ते १० लाख भाविक यात्रेस उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दी नियंत्रणात ठेवणे, वाहतूक कोंडी टाळणे व अपघात टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने काही मार्ग बंद करून पर्यायी मागनि वाहतूक वळविण्याचा निर्णय घेतला आहे.
पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार मुरगूड- कोल्हापूर-मुदाळ तिट्टा- गारगोटी-राधानगरी मार्गावरील वाहतूक निढोरी-सोनाळी रोड- बिद्री-मुदाळ तिट्टा मार्गे वळविण्यात येणार आहे. मुदाळ तिट्टा ते मुरगूड-निपाणी मार्गावरील वाहतूक मुदाळ-सूतगिरण मार्गे वाघापूर फाटा- निडोरी मार्गे वळविण्यात येणार आहे.
यात्रा काळात मुदाळ तिट्टा ते निबोरी दरम्यानचा संपूर्ण रस्ता तसेच आदमापूर येथील उड्डाण पुलाखालील रस्ता नो पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. भाविकांच्या वाहनांसाठी भीष्मा पार्किंग (उत्तर व दक्षिण बाजू), आर. के. इंजिनिअरिंग पार्किंग तसेच बाळूमामा देवालयाची साडेसात एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
एसटी बससाठी देवालयाची साडेतीन एकर जमीन राखीव ठेवली आहे. यात्रेदरम्यान वाहतूक नियमांचे पालन करावे, पोलिसांना सहकार्य करावे व अधिकृत पार्किंगचा वापर करावा, असे आवाहन भुदरगड पोलिसांनी केले आहे. आवश्यकतेनुसार काही रस्ते तात्पुरते बंद करण्याची शक्यता असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.




