"कोल्हापूर स्टाईल इंटिग्रेटेड स्कूल हेल्थ कॉम्प्लेक्स” ही अभिनव संकल्पना

"कोल्हापूर स्टाईल इंटिग्रेटेड स्कूल हेल्थ कॉम्प्लेक्स” ही अभिनव संकल्पना

कोल्हापूर (प्रतिनिधी) - शाळेत योग्य स्वच्छता सुविधा उपलब्ध नसल्यामुळे एका विद्यार्थिनीच्या आरोग्यावर झालेल्या परिणामाने जिल्हा परिषद व शिक्षण विभागाचे लक्ष वेधले. या घटनेतून एक महत्त्वाचा संदेश समोर आला. शाळेची इमारत जितकी महत्त्वाची आहे, तितकीच विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः मुलींसाठी, स्वच्छता सुविधा अत्यावश्यक आहेत. याच विचारातून “कोल्हापूर स्टाईल इंटिग्रेटेड स्कूल हेल्थ कॉम्प्लेक्स” ही अभिनव संकल्पना आकाराला आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेएन एस. आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांच्या नेतृत्वाखाली एक ठोस, टिकाऊ आणि संवेदनशील आराखडा तयार करण्यात आला. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली १५ व्या वित्त आयोगाच्या (जि.प. स्तर) निधीतून हा उपक्रम राबवण्यात आला.

विद्यार्थी संख्या आणि विशेषतः मुलींची उपस्थिती अधिक असलेल्या शाळांमध्ये आधुनिक स्वच्छता सुविधा उभारण्यावर भर देण्यात आला. निकषांनुसार हेल्थ कॉम्प्लेक्सचे तीन प्रकार निश्चित करण्यात आले - 

- Type A (२०० पेक्षा जास्त विद्यार्थी),

- Type B (१०० ते २०० विद्यार्थी),

- Type C (१०० पेक्षा कमी विद्यार्थी).

या प्रकल्पात टिकाऊ, दर्जेदार व सौंदर्यपूर्ण साहित्याचा वापर करण्यात आला. पाणीपुरवठ्यासाठी Finolex, Jain, Kisan Pipes; विद्युत कामासाठी Polycab, Apar Wires; प्रकाशयोजनेसाठी Philips, Siska; फ्लोअरिंगसाठी Kajaria, Jonson, Simplo Tiles; तसेच Jaquar, Kolhar, Toto यांसारख्या नामांकित ब्रँड्सची स्वच्छतागृह उपकरणे वापरण्यात आली. यामुळे प्रकल्पात गुणवत्ता आणि एकसंधता साधली गेली.

प्रत्येक स्वच्छतागृहात आरसा, हँडवॉश डिस्पेन्सर, पेपर डिस्पेन्सर, एअर फ्रेशनर, स्वतंत्र ओले व कोरडे कचरापेट्या, हँड टॉवेल्स, एक्झॉस्ट फॅन, डोअर मॅट्स व फुलझाडे अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आरोग्य, स्वच्छता आणि सौंदर्य यांचा उत्तम समतोल येथे दिसून येतो. मुलींच्या आरोग्य व सन्मानाचा विशेष विचार करून सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन, डिस्पेन्सर आणि इन्सिनरेटर बसवण्यात आले आहेत. यामुळे मुलींचा आत्मविश्वास वाढला असून शाळेतील उपस्थिती व शिक्षणातील सहभागही वाढला आहे. या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची सवय लागली, शाळेचा दर्जा उंचावला आणि एकूणच शाळेचे वातावरण अधिक आनंदी व सकारात्मक झाले आहे. ही स्वच्छतागृहे केवळ सुविधा नसून बांधकाम, सौंदर्य, शिस्त आणि संवेदनशीलतेचा आदर्श नमुना ठरली आहेत.

प्रकल्पाची अंमलबजावणी District Schedule of Rates (DSR) नुसार करण्यात आली असून कोणताही अतिरिक्त निधी खर्च करण्यात आलेला नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी (प्राथमिक), कार्यकारी व कनिष्ठ अभियंते यांच्या संयुक्त देखरेखीखाली गुणवत्ता सुनिश्चित करण्यात आली आहे. नियमित स्वच्छता व देखभाल शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीमार्फत करण्याचे नियोजन आहे.

“कोल्हापूर स्टाईल इंटिग्रेटेड स्कूल हेल्थ कॉम्प्लेक्स” हा केवळ एक प्रकल्प नसून विद्यार्थ्यांच्या आरोग्य, स्वच्छता आणि आत्मसन्मानाचा उत्सव आहे. “स्वच्छ शाळा म्हणजे आरोग्यदायी समाज” या मंत्राने जिल्हा परिषद कोल्हापूर शाळांना सुरक्षित, सन्मानपूर्ण आणि आरोग्यदायी वातावरण देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.