डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या कॉम्प्युटर शाखांना 'एक्सलंट' रेटिंग; एमएसबीटीईकडून शैक्षणिक गुणवत्तेवर मोहोर

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या कॉम्प्युटर शाखांना 'एक्सलंट' रेटिंग; एमएसबीटीईकडून शैक्षणिक गुणवत्तेवर मोहोर

कोल्हापूर/प्रतिनिधी : कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या कॉम्प्युटर इंजिनीअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्स या शाखांनी उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून (MSBTE) 'एक्सलंट' (उत्कृष्ट) श्रेणी पटकावली आहे. तसेच संस्थेच्या मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनीअरिंग शाखांना 'व्हेरी गुड' श्रेणी मिळाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या 'अकॅडमिक मॉनिटरिंग' मूल्यमापनात हे यश मिळाल्याची माहिती प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी दिली.


एमएसबीटीईच्या तज्ज्ञ समितीने संस्थेतील शैक्षणिक कामकाज, विद्यार्थ्यांचे निकाल, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरी, उद्योग क्षेत्रासोबत झालेले सामंजस्य करार (MoUs), प्राध्यापकांचे संशोधन आणि विद्यार्थ्यांच्या नावे झालेले पेटंट्स अशा विविध निकषांची कसून तपासणी केली होती. या समितीच्या सकारात्मक अहवालानंतरच ही श्रेणी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय, 'हिरकणी मंच' अंतर्गत विद्यार्थिनींसाठी राबवलेले उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या दर्जेदार प्लेसमेंटसाठी (नोकरी) केलेल्या विशेष प्रयत्नांचीही समितीने दखल घेतली.

या यशाबद्दल डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता आणि सीएचआरओ श्रीलेखा साटम यांनी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

या बहुमानासाठी प्राचार्य डॉ. महादेव नरके, उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेणके, तसेच विभागप्रमुख डॉ. पी. के. शिंदे, प्रा. एस. बी. शिंदे, प्रा. अक्षय करपे, प्रा. शीतल साळोखे आणि संपूर्ण स्टाफने विशेष परिश्रम घेतले.