पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा : भाजपची निर्णायक बैठक होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा : भाजपची निर्णायक बैठक होणार

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असून, आज त्यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पार पडले. त्याचबरोबर मुंबईतील भूमिगत मेट्रो प्रकल्पाचाही लोकार्पण सोहळा पार पडला. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात महत्त्वाच्या घडामोडी घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदींचा दौरा राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

विशेष म्हणजे, आज पंतप्रधान मोदी मुंबईतील भाजप आमदार, खासदार आणि मंत्र्यांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. ही बैठक राजभवनात आयोजित करण्यात आली असून, यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, तसेच पक्षाचे सर्व आमदार, खासदार आणि मंत्री सहभागी होणार आहेत. बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी आगामी निवडणुकांसंदर्भात मार्गदर्शन व रणनीतीबाबत महत्वाचा संदेश देणार असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई महापालिकेवर गेल्या अनेक दशकांपासून शिवसेनेची सत्ता होती. ‘मुंबई म्हणजे शिवसेना’ अशी प्रतिमा जनमानसात निर्माण झाली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव मुंबईत मोठ्या प्रमाणावर होता. मात्र, गेल्या काही वर्षांत भाजपने शिवसेनेत फूट पाडण्यात यश मिळवलं. परिणामी पक्षाचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडून निघून गेले. पक्षचिन्ह आणि नाव दोन्हीही त्यांच्या ताब्यात राहिले नाही.

यामुळे आता भाजप मुंबई महापालिकेची सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. भाजपने याआधीच्या निवडणुकीत शिवसेनेला कडवी टक्कर दिली होती, पण सत्ता मात्र शिवसेनेच्याच हातात राहिली. यावेळी मात्र भाजप पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. विकासकामांच्या माध्यमातून जनतेचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आपल्या स्थानिक नेत्यांना काय दिशा दाखवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईतील सत्ता बदलाच्या दृष्टीने ही बैठक निर्णायक ठरू शकते.