बाळूमामा भंडारा उत्सवाला मेतके येथे उत्साहात सुरुवात

बाळूमामा भंडारा उत्सवाला मेतके येथे उत्साहात सुरुवात

कापशी (प्रतिनिधी): मूळ क्षेत्र मेतके (ता. कागल) येथे सद्‌गुरू बाळूमामा यांच्या भंडारा उत्सवाची आज सुरुवात झाली. हरिनाम सप्ताह, रिंगण सोहळा व भंडारा महोत्सवाचे ध्वजारोहण करण्यात आले.

मूळ क्षेत्र मेतके येथे बाळूमामांनी १९३२ पासून भंडारा उत्सव सुरू केला. त्याची अखंड परंपरा येथे जपली जात आहे. यावर्षीच्या उत्सवाची सुरुवात भक्तिमय वातावरणात आज झाली. त्यानिमित्त वीणा पूजन व ग्रंथ पूजन विधी झाले. भंडारा उत्सव व रिंगण सोहळ्यासाठी ध्वजारोहण करण्यात आले.

या उत्सवामध्ये श्रींचा भंडारा नामसप्ताह २१ ते २७ फेब्रुवारीपर्यंत होणार असून, २८ रोजी महाप्रसाद होणार आहे. या काळात बळीराम तांबेकर, उदयशास्त्री, संजय वेळूकर, महेश जाधव, एकनाथ गुरव, पांडुरंग उपलाने, शशिकांत गुरव, विकास देवडे यांचे प्रवचन व कीर्तन होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मूळ क्षेत्र मेतके येथील श्री सद्‌गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्ट यांनी केले आहे. यावेळी बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टचे कार्याध्यक्ष पापा पाटील, अध्यक्ष राजेंद्र पाटील, विश्वस्त बाबासाहेब पाटील, दयानंद पाटील, देवाप्पा पुजारी, बळीराम मगर, भजनी मंडळ, ग्रामस्थ व परिसरातील भाविक उपस्थित होते.