मराठा समाजाने कुणबी प्रमाणपत्र कसे मिळवावे ?
मुंबई - मराठा समाजासाठी आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत पाच दिवस आंदोलन केल्यानंतर राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मराठा समाजातील लोकांना 'कुणबी' जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात शासनाने अधिकृत आदेश (GR) काढला आहे. त्यामुळे हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

‘कुणबी’ जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया :
शाळा दाखला तपासा -
- आपल्या रक्तसंबंधातील नातेवाईक (जसे की वडील, आजोबा इ.) यांचा प्राथमिक शाळेतील प्रवेशाचा किंवा शाळा सोडल्याचा दाखला मिळवा.
- त्या दाखल्यावर 'कुणबी' असा उल्लेख आहे का, ते तपासा.
गाव नमुना क्रमांक १४ / कोतवाल बुक तपासणे -
- स्वातंत्र्यपूर्व काळात गावात जन्म व मृत्यूच्या नोंदी जातीनिशी कोतवाल बुक किंवा गाव नमुना क्रमांक १४ मध्ये होत्या.
- संबंधित तहसील कार्यालयात जाऊन आपल्या रक्तनातेसंबंधातील नातेवाईकाची नोंद असलेली नक्कल मिळवा आणि त्यात 'कुणबी' असा उल्लेख आहे का, हे पाहा.
जुनी महसूल कागदपत्रे तपासणे -
- वारस नोंदी (6-D), जमीन वाटप, 7/12, 8अ, फेरफार, खरेदीखत, भाडेपट्टा, सूडपत्र, हक्कपत्रक यांसारख्या कागदपत्रांमध्ये 'कुणबी' जात दाखवली आहे का, हे तपासा.
असे पुरावे मिळाल्यास त्याची अधिकृत प्रत काढा -
सरकारी नोकरीतील नातेवाईकांचा पुरावा -
जर तुमचा रक्तसंबंधातील नातेवाईक सरकारी किंवा निमसरकारी नोकरीत असेल आणि त्याच्या सर्व्हिस बुकच्या पहिल्या पानावर 'कुणबी' जात नमूद असेल, तर त्याची साक्षांकित प्रत मिळवा.
पूर्वीच मिळालेलं जात प्रमाणपत्र -
जर तुमच्या रक्तसंबंधातील नातेवाईकाकडे आधीच 'कुणबी' जात प्रमाणपत्र आणि त्याची पडताळणी समितीकडून मिळालेली वैधता असेल, तर ते देखील जात सिद्ध करण्यासाठी ग्राह्य धरले जाईल.
महत्त्वाची अट -
तुम्हाला 'कुणबी' प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुमच्या रक्तसंबंधातील एखाद्या नातेवाईकाचा (वडील, आजोबा, चुलते, पणजोबा, खापर पणजोबा वगैरे) 13 ऑक्टोबर 1967 रोजी किंवा त्यापूर्वी जन्म झालेला असावा आणि त्याच्या नावावर 'कुणबी' जात स्पष्टपणे नमूद असलेला कागदजात पुरावा असणे आवश्यक आहे.




