मोबाईल ठेवा दूर, अभ्यास करा भरपूर - तुषार बुरूड

मोबाईल ठेवा दूर, अभ्यास करा भरपूर - तुषार बुरूड

कोल्हापूर (प्रतिनिधी) - विद्यार्थी आणि शिक्षक यांचे नाते कसे असते याचे पुन्हा एकदा प्रत्यंतर मला नुतन मराठी विदयालय हायस्कूलमध्ये आले. इथल्या शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण दिले नसून जिव्हाळा आणि प्रेमही दिले आहे. याची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी सोशल मीडीयापासून दूर राहून आपल्या यापुढील शिक्षणाच्या काळात भरपूर अभ्यास, वाचन आणि कष्ट करावेत. हेच त्यांच्या भवितव्यासाठी उपयुक्त ठरणार आहे असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरूड यांनी केले. नूतन मराठी विद्यालय हायस्कूलमध्ये दहावी विद्यार्थी सदिच्छा समारंभावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 

दि प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीच्या नूतन मराठी विद्यालय हायस्कूल मध्ये शनिवारी दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ अतिशय भावपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन उदय सांगवडेकर होते. 

मुख्याध्यापक धनंजय बेदरे यांनी स्वागत केले. तर समारंभ प्रमुख संजीवनी देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सर्व मान्यवरांनी संस्थेचे संस्थापक कै.विभुते गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन संपन्न केले. ईश्वरी काजरेकर हिने ईशस्तवन सादर केले. प्रमुख अतिथी तुषार बुरूड यांचे स्वागत उदय सांगवडेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व ग्रंथ भेट देऊन करण्यात आले. प्रमुख अतिथींचा परिचय विनय शिंदे यांनी करून दिला. जिमखाना प्रमुख रश्मी भागवत यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. आदिनाथ मुनीश्वर, आजम शेख ,ओंकार बैरागी, समर्थ मकोटे, नारायणी दुर्गुळे, तनिष्का ढोकरे, राहत मौलवी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. 

अरुणा वडणगेकर यांनी आभार मानले. यावेळी संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य प्रकाश मेहता, प्रशांत कुलकर्णी, मिलिंद करमळकर, समीर देशपांडे विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. सूत्रसंचालन पल्लवी कुलकर्णी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनुराधा दीक्षित, दीपा नवरे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

यावेळी डावीकडून धनंजय बेद्रे, मिलिंद करमळकर, प्रकाश मेहता,उदय सांगवडेकर, प्रशांत कुलकर्णी, समीर देशपांडे उपस्थित होते.