योजनांचा सर्वसामान्यांना लाभ होण्यासाठी सदस्यांनी प्रयत्न करावेत- सभापती विद्या पाटील

योजनांचा सर्वसामान्यांना लाभ होण्यासाठी सदस्यांनी प्रयत्न करावेत-  सभापती विद्या पाटील

कोल्हापूर( प्रतिनिधी): महिला आणि बालविकासाबाबतच्या या आर्थिक वर्षातील योजनांचे स्वरूप येणाऱ्या सभेमध्ये निश्चित करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या पहिल्या सभेत घेण्यात आला. समितीच्या सभापती विद्या पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. 

जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या महिला समुपदेशन केंद्रांचे मानधन वाढवण्यासाठी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत मान्यता घेऊन शासनाकडून मार्गदर्शन मागवण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून नवीन अंगणवाडी इमारती बांधणे आणि नादुरुस्त इमारतींची दुरुस्ती करण्याच्या आराखड्यावरही चर्चा करण्यात आली.

 समितीच्या विविध योजना निश्चित झाल्यानंतर त्या योजनांचा सर्वसामान्यांना लाभ व्हावा यासाठी सदस्यांनी प्रयत्न करावे असे सभापती विद्या पाटील यांनी सांगितले.

 यावेळी सदस्या वर्षाराणी पाटील, शिवानी भोसले, शैलजा पाटील, रोहिणी आबिटकर, सोनाली पाटील, संयोगिता मोरे, प्रतिभा चव्हाण, जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मस्के यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.