लाडकी बहीण योजनेतून 92 लाख महिला बाद! रोहिणी खडसेंचा फडणवीस-शिंदेंवर घणाघात
मुंबई (प्रतिनिधी) : लाडकी बहीण योजनेतून तब्बल 92 लाख महिलांची नावे वगळण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. अवघ्या महिनाभरापूर्वी 80 लाख लाभार्थी कमी झाल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र आता हा आकडा वाढून 92 लाखांवर पोहोचला आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करत, "आता लाडक्या बहिणी सरकारला जड झाल्या का?" असा सवाल उपस्थित केला आहे.
खडसे यांनी सरकारवर महिलांच्या योजनांमध्ये मोठी कपात केल्याचा आरोप करत, "वहिनींचे सगळे लाड पुरवता, मग लाडक्या बहिणींवर अन्याय का?" असा टोला लगावला. तसेच सुनेत्रा पवार यांनीही या मुद्द्यावर भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, प्रशासकीय सूत्रांच्या माहितीनुसार, ई-केवायसी न करणे, उत्पन्नाची मर्यादा ओलांडणे, वयोमर्यादेचे निकष पूर्ण न होणे अशा विविध कारणांमुळे लाभार्थ्यांची फेरतपासणी करून नावे वगळण्यात आली आहेत. याशिवाय, सुमारे 14 हजार पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आल्याने त्यांनाही अपात्र ठरवण्यात आले आहे.
दुसरीकडे, नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) यांच्या अहवालातही या योजनेच्या वाढत्या खर्चाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अहवालानुसार, या योजनेमुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर मोठा ताण येण्याची शक्यता असून, काही खर्चाबाबत पुरेसे समर्थन उपलब्ध नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
लाडकी बहीण योजनेतील ही मोठी कपात, विरोधकांचे आरोप आणि CAG च्या निरीक्षणांमुळे हा विषय आता राज्याच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.




