शरद मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेत्र व ईएनटी विभागाचा शुभारंभ

शरद मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेत्र व ईएनटी विभागाचा शुभारंभ

यड्राव (प्रतिनिधी):  शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर अंतर्गत कार्यरत शरद मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आधुनिक वैद्यकीय सुविधांचा आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला असून, नेत्ररोग तसेच कान, नाक, घसा (ईएनटी) विभागाचे उद्घाटन संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांच्या हस्ते संपन्न झाले.

या उद्घाटन प्रसंगी शरद आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रमोद कणप प्रमुख उपस्थिती होती. या नव्याने सुरू झालेल्या विभागांमध्ये अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असून, नेत्ररोग तज्ञ डॉ. कौस्तुभ पाटील, ईएनटी तज्ञ डॉ. प्रविण ख्वैरकपम हे रुग्णांना सोमवार आणि गुरुवारी सायंकाळी ५ ते ७ काळात सेवा देणार आहेत. 

      यावेळी अनिल बागणे म्हणाले, शरद मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलने अल्पावधीतच रुग्णसेवेत विश्वासार्ह स्थान निर्माण केले आहे. रुग्णांना एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने नेत्ररोग व ईएनटी विभागाची सुरुवात करण्यात आली आहे. या नव्या विभागांमुळे डोळ्यांचे विकार, दृष्टीदोष, तसेच कान, नाक व घशाशी संबंधित आजारांचे अचूक निदान आणि अत्याधुनिक उपचार स्थानिक पातळीवरच मिळणार आहेत.ते पुढे म्हणाले, ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, ही संस्थेची भूमिका असून, याच ध्येयाने हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या, निदान सुविधा, उपचार आणि तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. भविष्यातही अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सर्वसमावेशक व अधिक प्रगत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देत, रुग्णसेवेचा दर्जा अधिक उंचावण्याचा संस्थेचा ठाम मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

      यामुळे अत्याधुनिक यंत्रसामग्री व तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे अचूक निदान व परिणामकारक उपचार शक्य होणार आहेत. यावेळी विविध विभागांतील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.