शिक्षकांनाही कॅशलेस आरोग्य सुविधा योजना लागू करणार - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

शिक्षकांनाही कॅशलेस आरोग्य सुविधा योजना लागू  करणार - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) - सर्वच खात्यातील कर्मचाऱ्यांना कॅशलेस आरोग्य सुविधा लागू करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे नजीकच्या कालावधीत शिक्षकांनाही कॅशलेस आरोग्य सुविधा लागू करण्याचे आश्वासन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. ते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या कोल्हापूर येथे झालेल्या महामंडळ सभेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. 

सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेला निर्णय शिक्षकांच्या वर अन्याय करणारा असून याबाबत महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात सविस्तर चर्चा करून सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका शिक्षण मंत्री यांचे मार्फत दाखल करणार असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

राज्यस्तरीय महामंडळ सभा तातडीने आयोजित करण्या पाठीमागची भूमिका कार्यकारीअध्यक्ष विलास चौगुले यांनी मांडली. 

या सभेत राज्य अध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी शिक्षकांच्या वर लादलेल्या टीईटी संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच संघटनेच्या वतीने प्रसंगी रस्त्यावर उतरून मोर्चा काढून याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले.

महामंडळ सभेच्या अध्यक्षस्थानी शिक्षक संघाचे राज्य नेते संभाजी थोरात होते. शिक्षकांच्या विविध प्रश्नांचा आढावा घेत यापुढे येणाऱ्या विविध शैक्षणिक संकटाबाबत शिक्षकांना मार्गदर्शन केले. 

या महामंडळ सभेचे स्वागत सुनील पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक अध्यक्ष रविकुमार पाटील यांनी केले.

यावेळी विनायक शिंदे, विलास चौगुले, बाळासाहेब तांबारे, आबासाहेब जगताप, मधुकर काठोळे, इत्यादींनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब निंबाळकर यांनी मानले. 

या सभेस बाळासाहेब झावरे, बळवंत पाटील, कैलास दहातोंडे व राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी तसेच राज्य कार्यकारणीचे पदाधिकारी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.