शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारचा मोठा निर्णय ; कर्जमाफी पाठोपाठ जुनी वीज बिलंही पूर्णपणे माफ
मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने आणखी एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीच्या घोषणेनंतर, आता राज्यातील शेतकऱ्यांची तब्बल ४८ हजार कोटी रुपयांची थकीत वीज बिलं पूर्णपणे माफ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील कर्जमाफीच्या निर्णयाबद्दल आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.

बुधवारी (१५ जुलै) मुंबईत शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपची अनेक नेतेमंडळी आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. याच मंचावरून मुख्यमंत्र्यांनी वीज बिल माफीची घोषणा करत शेतकऱ्यांना दुहेरी दिलासा दिला.
साडेसात हॉर्सपॉवरपर्यंतची जुनी बिलं होणार माफ
कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "शेतीला पाणी देण्यासाठी साडेसात हॉर्सपॉवरचे जे मोटारपंप वापरले जातात, त्यांना सध्या बिल येत नाही. मात्र, यापूर्वीची जुनी बिलं अजूनही प्रत्येकाच्या नावाने खात्यात जमा आहेत आणि त्याची वसुली कधीही होऊ शकते. या थकीत बिलांमुळे शेतकऱ्यांना दुसरं कुठलंही नवीन कनेक्शन घ्यायला अडचण येत होती. त्यामुळे आमच्या सरकारने ४८ हजार कोटी रुपयांची ही जुनी बिलं पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्याची पाटी पूर्णपणे कोरी झाली पाहिजे आणि त्याने नव्या जोमाने इतिहास लिहिला पाहिजे, हाच यामागचा उद्देश आहे."
'राजकारण करू, पण बळीराजाच्या जीवावर नाही!'
कर्जमाफी आणि वीज बिल माफीच्या मुद्द्यावर विरोधकांवर निशाणा साधताना मुख्यमंत्री म्हणाले, "मी नेहमीच राज्याच्या आर्थिक शिस्तीबद्दल स्पष्टपणे बोललो आहे. मात्र, महायुतीतील सहकारी मंडळींशी जेव्हा सविस्तर चर्चा झाली, तेव्हा आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. जर आम्हाला केवळ राजकारणच करायचे असते, तर २०२९ च्या विधानसभा निवडणुकीच्या शेवटी आम्ही कर्जमाफीचा विचार केला असता. राजकारण आम्ही करूच, ते तर करावंच लागेल; मात्र बळीराजाच्या जीवावर राजकारण करणार नाही," असा स्पष्ट टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.




