सागर पाटील यांची संभाजी ब्रिगेड कोल्हापूर जिल्हा समन्वयक पदी निवड
कोल्हापूर (प्रतिनिधी): गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील विविध स्तरांवर केलेले उल्लेखनीय सामाजिक कार्य, जनसामान्यांच्या प्रश्नांची असलेली सखोल जाण आणि निस्वार्थ सेवावृत्तीची दखल घेऊन सागर पाटील यांची संभाजी ब्रिगेड कोल्हापूर जिल्हा समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली.

छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष अश्विनकुमार वागळे यांच्या शुभहस्ते व भगवान कोइंगडे (जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, कोल्हापूर) निलेश चव्हाण (शहराध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, कोल्हापूर) यांच्या उपस्थितीत सागर पाटील यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
सागर पाटील यांनी आजवर विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिले आहे. त्यांच्या या कार्यामुळे संघटनेला जिल्ह्यात अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास यावेळी जिल्हाध्यक्ष भगवान कोइंगडे यांनी व्यक्त केला.
या नियुक्तीबद्दल बोलताना सागर पाटील म्हणाले, "संभाजी ब्रिगेडने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला पात्र ठरून छत्रपती संभाजी महाराजांचे विचार आणि बहुजन समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन."
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, विविध विभागांचे अध्यक्ष आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. सागर पाटील यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.




