स्वतःला कमी लेखू नका; कौशल्य आणि आत्मविश्वासातूनच यश - कुलगुरु पद्मश्री जी.डी. यादव
शिरोळ (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांनी स्वतःला कधीही कमी समजू नये. अपयश हे तात्पुरते असते, पण यश कायमस्वरूपी ठसा उमटवणारे असते. त्यामुळे शिक्षण घेत असताना केवळ क्रेडिट्स मिळविण्यावर भर न देता, प्रत्यक्ष ज्ञानाचे हस्तांतरण होणे अधिक महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना केवळ पदवीधर नव्हे, तर उद्योगासाठी पात्र, देशासाठी जबाबदार आणि समाजासाठी उपयुक्त नागरिक बनविणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन कुलगुरु पद्मश्री डॉ. जी.डी. यादव यांनी केले. ते यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे आयोजित ‘इनोव्हेशन २के२६’ या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी डॉ. वासंती यादव प्रमुख उपस्थीत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे होते.

डॉ. यादव पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर विकासात्मक कामांसाठी, नवसर्जनासाठी आणि समाजोपयोगी निर्मितीसाठी करायला हवा. टाकाऊ वस्तूंमधून उपयुक्त निर्मिती करण्याची वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये विकसित झाली, तर त्यातून नवोन्मेष, उद्योजकता आणि शाश्वत विकास साध्य होऊ शकतो. इनोव्हेशनसारख्या स्पर्धा विद्यार्थ्यांना आपले तांत्रिक ज्ञान, कौशल्य, कल्पकता आणि संशोधनवृत्ती जगासमोर मांडण्याची मोठी संधी देतात. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, प्रयोगशीलता आणि जबाबदारीची भावना निर्माण झाली, तर ते केवळ स्वतःचेच नव्हे तर देशाचे भविष्य घडवू शकतात.
यावेळी श्री बागणे म्हणाले, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या ‘महासत्ता भारत’ या स्वप्नपूर्तीसाठी ग्रामीण विद्यार्थ्यांची जिद्द, प्रतिभा आणि नवोन्मेषी विचारसरणी हीच खरी शक्ती ठरणार आहे. जीवनात आणि करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी सकारात्मक विचार अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी केवळ स्वतःच्या करिअरसाठीच नव्हे, तर कुटुंब, गाव, देश आणि संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी सातत्याने कार्यरत राहिले पाहिजे. शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नसून, ते जीवन घडविण्यासाठी आणि समाज उन्नत करण्यासाठी असते.यावेळी महाराष्ट्रासह कर्नाटकातील अनेक महाविद्यालयातून हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते.
सिव्हील- स्पॅन इट राईट, मेकॅनिकल- कॅड मॅनिया, टेक्निकल क्युझ, इलेक्ट्रॉनिक्स- रेक रिल्स, इलेक्ट्रो ब्रेनसस्ट्रॉम, हिअर क्युस्ट, इलेक्ट्रीकल- आयडिया एक्स्पो, मेकॅट्रॉनिक्स- मेकॅसर्किट अरेना, अॅटोमेशन रोबोटीक्स- ब्रेनस्पार्क क्युझ, रोबो ब्लाझ, इनोव्हेटेक्स, कॉम्प्युटर सायन्स- जावा मास्टर, टेक नॅरेट, इंटेलेक्ट अरेना, ए.आय.-आयडिया फोर्ज, ब्रेन बाइट, प्रथमवर्ष- स्लाइट मास्टर, माइंड स्पार्क, पोस्टर प्रेजेन्टेंशन यासह सर्व विभागात पेपर प्रेझेंटेशनसह २५ स्पर्धा झाल्या.
प्राचार्य डॉ. बी.बी. संगमे यांनी मनोगत व्यक्त केले. स्पर्धेचे समन्वय प्रा. अंजली झळके यांनी केले. सूत्रसंचालन अदिती काळे, मंजीरी जगताप यांनी केले. आभार प्रा. पी.एम. स्वामी यांनी मानले. यावेळी सर्व डिन, विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थीत होते. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले.




