अंबाबाई मंदिरानंतर आता ज्योतिबा मंदिरातही तोडफोड ? कळस फोडल्याने पाणी गळती, कोल्हापूरकर संतापले
कोल्हापूर/प्रतिनिधी : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील तोडफोड आणि पाणी गळतीचा वाद ताजा असतानाच, आता कोल्हापूरकरांचे आराध्य दैवत असलेल्या वाडी रत्नागिरी येथील श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्योतिबा मंदिरातील महादेव मंदिराचा कळस चक्क ब्रेकर लावून फोडला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, यामुळे मंदिरात प्रचंड प्रमाणात पाणी गळती सुरू झाली आहे. या बेजबाबदार कारभारामुळे आता कोल्हापूरकर कमालीचे आक्रमक झाले आहेत.

काही दिवसांपूर्वीच अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी गळती होत असल्याचा आणि मंदिराचे मूळ दगड कापले जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्या वेळी शिवसेनेचे नेते हर्षल सुर्वे यांनी या प्रकाराविरोधात जोरदार आवाज उठवला होता. या घटनेनंतर कोल्हापूरकरांनी तीव्र संताप व्यक्त करत पुरातत्व विभागाच्या ढिसाळ कारभारावर ताशेरे ओढले होते. हा वाद शांत होत नाही तोच आता ज्योतिबा मंदिरातही तसाच प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.
ज्योतिबा मंदिरात सध्या संवर्धनाचे काम सुरू आहे. मात्र, हे काम करताना पुरातत्व विभागाकडून अत्यंत निष्काळजीपणा केला जात असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांनी केला आहे. महादेव मंदिरावरील कळस थेट ब्रेकर लावून फोडला गेल्यामुळे छताला तडे गेले असून मंदिरात पाणी गळती सुरू झाली आहे. ऐतिहासिक वास्तूचे नुकसान थांबवण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी दिलीप देसाई यांनी केली आहे.
संवर्धना नावाखाली देवस्थानांच्या मूळ वास्तूंना आणि ऐतिहासिक ठेव्याला धक्का लावला जात असल्यामुळे भाविकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. अंबाबाई मंदिरानंतर आता ज्योतिबा मंदिराबाबत समोर आलेल्या या प्रकारानंतर प्रशासन खडबडून जागे होणार का आणि ही पाणी गळती रोखण्यासाठी तातडीने पावले उचलणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.




