अखेर महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला

अखेर महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला

कोल्हापूर (प्रतिनिधी) - महापालिका निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाल्यापासून राजकीय नेत्यांच्या आणि इच्छुक उमेदवारांच्या बैठका पार पडत आहेत. काही राजकीय पक्षांच्या उमेदवारी यादी जाहिर करण्यात आल्या आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ३० डिसेंबर ही अंतिम तारीख आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांसह उमेदवारही जोमाने निवडणूकीच्या तयारीला लागले आहेत. अशातच आता, कोल्हापूर महापालिका निवडणूकीसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  भारतीय जनता पक्षाला 37, शिवसेनेला 30 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला 14 जागा देण्यावर एकमत झाले आहे. या ठरलेल्या फॉर्म्युल्यामध्ये एखादं दुसरी जागा कमी जास्त होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात आली आहे. आज उमेदवारांची अधिकृत घोषणा केली जाणार असून या घोषणेवेळी मंत्री हसन मुश्रीफ, खा. धनंजय महाडिक, आ. राजेश क्षीरसागर यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

तिन्ही पक्षांकडून जास्तीत जास्त जागांवर दावा केला जात असल्यामुळे जागावाटपाचा फॉर्म्युला जाहिर करण्यासाठी वेळ लागला आहे. त्याचबरोबर, आज सकाळी खा. धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी फोनद्वारे बैठकीत सहभाग घेतला होता. या बैठकीवेळी 81 जागांच्या वाटपावर सविस्तर चर्चा करण्यात आली. पक्षनिहाय ताकद, तसेच प्रभागनिहाय संभाव्य उमेदवारांवरही चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर भाजप 37, शिवसेना 30 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 14 असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचेही सांगण्यात आले आहे.