'अजित दादांचं काय झालं, कोणालाच मेळ नाही'; मनोज जरांगेंचा मराठा समाजाला सल्ला, म्हणाले 'शहाणे व्हा मराठ्यांनो'

'अजित दादांचं काय झालं, कोणालाच मेळ नाही'; मनोज जरांगेंचा मराठा समाजाला सल्ला, म्हणाले 'शहाणे व्हा मराठ्यांनो'

मुंबई (प्रतिनिधी) : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दहावा दिवस आहे. आज माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी पुढील आंदोलनाच्या नियोजनाबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या अपघाताच्या प्रकरणावरून आणि ईडीच्या कारवाईवरून सरकारवर जोरदार टीका केली. सरकार जाणूनबुजून हयगय आणि हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. त्यामुळे मराठा समाजाचा रोष वाढत असल्याचंही त्यांनी म्हटलं.

 सरकारला 12 तारखेपर्यंतचा वेळ दिला असून, त्या दिवशी सर्व मराठा बांधवांनी अंतरवाली सराटी येथे यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे. मुंबईत एका जरी तरुणाचं रक्त निघालं, तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद झाला पाहिजे, असा थेट इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. दरम्यान, ईडीच्या कारवाईवरून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. व्यावसायिकांच्या मागे ईडी लावली जाते. राजकारणी किंवा सत्ताधारी पक्षातील व्यक्ती सरकारविरोधात बोलली, तरी त्यांच्यामागे ईडी लावून त्यांना उध्वस्त केलं जात असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला.

 "शहाणे व्हा, जो बोलेल तो जेलमध्ये जाऊ लागला आहे. राजकारणी मराठे असोत किंवा व्यावसायिक मराठे, सगळ्यांची अशीच परिस्थिती आहे. कारखाने आणि शैक्षणिक संस्थांनाही बोलायला जागा राहिलेली नाही," असा आरोप त्यांनी केला. इतका मग्रूर शासक या राज्याला परवडणार नाही. एवढी हुकूमशाही सुरू असेल, तर हे सगळं तुम्ही कसं सहन करता, असा सवालही त्यांनी मराठा समाजाला केला. भाजपमधील कोणी सरकारविरोधात बोललं, तर त्यांच्यावरही ईडीची कारवाई करून बंदोबस्त केला जात असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. असं मग्रूर शासन राज्याला परवडणार नाही, भाजपमधील लोकांनीही हे समजून घ्यावं, असं ते म्हणाले.

 एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांचं आणि मंत्रिमंडळाचं काय सुरू आहे, याकडेही खोलात जाऊन पाहा. एवढी मग्रुरी चालवणारे फडणवीस योग्य नाहीत, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला. यानंतर अजित पवार यांच्या अपघाताच्या प्रकरणावरूनही जरांगे पाटील यांनी प्रश्न उपस्थित केले. "अजित दादांचं काय झालं, कोणालाच मेळ नाही. किती दिवस रिपोर्ट येणार? तपास कधी लागणार? सोन्यासारखा तुमचा माणूस गेला. मराठ्यांनो, राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करा," असं आवाहन त्यांनी केलं.

 आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याऐवजी माणसांवर सगळं लादण्याचं काम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. शरद पवार यांनी मराठा समाजासाठी काय केलं? उद्धव ठाकरे यांनी काय केलं? काँग्रेसने मराठ्यांसाठी काय केलं? हेही आम्हाला सांगा, असा सवाल जरांगे पाटील यांनी केला. आम्ही जे केलं ते कोणीच केलं नाही. तुम्ही दिलंही आणि उडवलंही. त्यांनी कमीत कमी दिलं तरी नाही, असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं. मी महाविकास आघाडीचं कौतुक करत नाही. त्यांनी मराठा समाजासाठी काहीच दिलं नाही. मात्र जे सत्य आहे, ते मराठ्यांनी पचवायला शिकलं पाहिजे, असं आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केलं. दरम्यान, 12 तारखेला अंतरवाली सराटी येथे मोठ्या संख्येने मराठा समाजाने उपस्थित राहण्याचं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं असून, त्यांच्या पुढील भूमिकेकडे आता लक्ष लागलं आहे.