अभिमन्यू पवारांच्या वाक्यानंतर मेधा कुलकर्णी संतापल्या, भर कार्यक्रमातून घेतला काढता पाय

अभिमन्यू पवारांच्या वाक्यानंतर मेधा कुलकर्णी संतापल्या, भर कार्यक्रमातून घेतला काढता पाय

 पुणे (प्रतिनिधी) : पुण्यात झालेल्या भाजपच्या एका कार्यक्रमात अनपेक्षितपणे राजकीय नाराजीनाट्य पाहायला मिळालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत यूपीएससी आणि एमपीएससीमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सुरू असतानाच व्यासपीठावरील आसनव्यवस्थेवरून वाद निर्माण झाला.

खासदार मेधा कुलकर्णी पहिल्या रांगेत बसल्या असताना आमदार अभिमन्यू पवार यांनी त्यांना जागेबाबत टिप्पणी केली. या वक्तव्यानंतर मेधा कुलकर्णी नाराज झाल्या आणि त्यांनी भर कार्यक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या घटनेची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.मात्र, या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना अभिमन्यू पवार म्हणाले की, त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. "मी फक्त अण्णासाहेब विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना पुढे बसू द्या, आपण दोघं मागे बसू, एवढंच म्हटलं होतं. यात कोणताही जातीचा संदर्भ नव्हता," असं त्यांनी स्पष्ट केलं.

यासोबतच, "मेधा ताई माझ्या वरिष्ठ नेत्या आहेत. माझ्या बोलण्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो," असंही अभिमन्यू पवार यांनी म्हटलं.या संपूर्ण घटनेमुळे भाजपमधील अंतर्गत नाराजीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.