असं रिलॅक्स राहून चालणार नाही, महाकुंभ तोंडावर आहे; नाशिकच्या खड्ड्यांवरून फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
मुंबई (प्रतिनिधी) : नाशिक शहरातील वाढत्या खड्ड्यांच्या समस्येची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची आढावा बैठक घेतली. नाशिक-त्र्यंबकेश्वर महासिंहस्थ कुंभाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून, खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांबाबत मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

बैठकीत देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्यांच्यावर खड्डे बुजवण्याची जबाबदारी आहे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा, गरज पडल्यास त्यांची पुढील कामेही थांबवा. नागरिकांना कारणं सांगू नका, त्यांना प्रत्यक्ष कामातून समाधान द्या. असं रिलॅक्स राहून चालणार नाही. महाकुंभ तोंडावर आहे, त्यामुळे अधिक गांभीर्याने काम करा.
मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देत, अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून न राहता प्रत्यक्ष मैदानात उतरून परिस्थितीची पाहणी करावी, असेही सांगितले. इतका मोठा खर्च करून विकासकामे सुरू असताना नागरिकांमध्ये नाराजी निर्माण होत असेल, तर त्यामागील कारणांचा गंभीरपणे विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, पुढील एका महिन्यानंतर पुन्हा आढावा बैठक घेणार असून, तोपर्यंत कामात गुणात्मक सुधारणा दिसली पाहिजे, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिला. महाकुंभासाठी देश-विदेशातून लाखो भाविक नाशिकमध्ये येणार असल्याने रस्त्यांची स्थिती तातडीने सुधारण्याचे आदेशही त्यांनी दिले.
दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, महाकुंभासाठी सुमारे 40 हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. कामांना अधिक गती देण्याबरोबरच दर्जाही कायम ठेवण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत. यंदाच्या महाकुंभासाठी 10 ते 12 कोटी भाविक येण्याची शक्यता असल्याने त्यांच्या सुविधा आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती त्यांनी दिली.




