आंदोलनानंतर अभिजीत दिपके देशभरात चर्चेत; लग्नासाठी मुलीकडून प्रस्तावांचा वर्षाव

आंदोलनानंतर अभिजीत दिपके देशभरात चर्चेत; लग्नासाठी मुलीकडून प्रस्तावांचा वर्षाव

मुंबई (प्रतिनिधी) : नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात झालेल्या तीव्र आंदोलनानंतर आणि 'Gen Z' विद्यार्थ्यांच्या आक्रमक आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. या आंदोलनाचा प्रमुख चेहरा आणि कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके हे सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरले आहेत. विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईच्या निषेधार्थ पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशाराही अभिजीत दिपके यांनी दिला आहे.

दरम्यान, अभिजीत दिपके यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी सांगितल्या. त्यांनी सांगितले की, आंदोलनादरम्यान अभिजीतवर एका विशिष्ट पक्षात प्रवेश करण्यासाठी दबाव आणण्यात आला होता. तसेच, नकार दिल्यास आई-वडिलांना परिणाम भोगावे लागतील, अशा प्रकारच्या धमक्याही मिळाल्या. या परिस्थितीमुळे काही दिवस ते नातेवाईकांकडे कोकणात राहायला गेले होते, असे त्यांनी सांगितले.

मात्र आता चित्र पूर्णपणे बदलले आहे. अभिजीतच्या आई-वडिलांच्या म्हणण्यानुसार, लग्नासाठी अनेक ठिकाणांहून फोन येत आहेत. नातेवाईक आणि परिचितांकडून मुलींची स्थळे सुचवली जात असून, आता अभिजीतचं लग्न करायला हवं, असा आग्रहही केला जात आहे. आम्हालाही आता सुनमुख पाहायचं आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी अभिजीतच्या बालपणीचा एक किस्साही त्यांनी सांगितला. लहानपणी तो खूप भित्रा होता. एकदा घरात ड्रिल करताना पाईपलाइन फुटल्याने वडील रागावतील या भीतीने तो थेट दिल्लीला निघून गेला होता, अशी आठवण त्यांनी सांगितली.

सध्या अभिजीतच्या स्वागताची तयारी घरात सुरू असून, तो घरी परतण्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने बोलताना त्याच्या आईने भावूक होत, आज तो आमचा गुरुच झाला आहे. तो आमचा आधार बनला आहे आणि आम्हीच आता त्याची मुलं झाल्यासारखं वाटतं, अशी भावना व्यक्त केली.