आमदारांच्या प्रगती पुस्तकात काँग्रेसचा दबदबा; वरुण सरदेसाई आदित्य ठाकरेंच्या पुढे, शिंदेंचे आमदार कितव्या क्रमांकावर?
मुंबई (प्रतिनिधी) : प्रजा फाउंडेशनकडून मुंबईतील आमदारांच्या कामगिरीचा वार्षिक अहवाल जाहीर करण्यात आला आहे. या अहवालानुसार मुंबईचे प्रश्न विधानसभेत मांडण्याच्या बाबतीत सत्ताधारी पक्षाचे आमदार तुलनेने निष्क्रिय असल्याचं दिसून आलं आहे. टॉप पाच आमदारांमध्ये सत्ताधारी पक्षाचा एकही आमदार नाही.

मुंबईत एकूण 36 आमदार आहेत. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, तसेच मंत्री आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा यांना या अहवालातून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे प्रजा फाउंडेशनने 33 आमदारांचं प्रगतीपुस्तक जाहीर केलं आहे. तळातील पाच आमदारांमध्ये प्रकाश सुर्वे, अशोक पाटील आणि राम कदम यांचा समावेश आहे.सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या टॉप 3 आमदारांमध्ये काँग्रेसच्या आमदारांचा समावेश आहे. काँग्रेसचे अमीन पटेल, अस्लम शेख आणि ज्योती गायकवाड हे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर ठाकरे गटाचे आमदार आहेत.
विशेष म्हणजे, शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे हे अहवालात शेवटच्या स्थानावर आहेत. तर आदित्य ठाकरे 18 व्या क्रमांकावर आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई मात्र दहाव्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे भाजपच्या तुलनेत ठाकरे गटाचे आमदार कामगिरीत पुढे असल्याचं या अहवालातून दिसत आहे.आमदारांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न विधानसभेत पोहोचतात का, हा कामगिरीचा सर्वात महत्त्वाचा निकष असल्याचं प्रजा फाउंडेशनने म्हटलं आहे.
पंधराव्या विधानसभेतील 33 आमदारांच्या एकत्रित कामगिरीचं चित्र चिंताजनक असल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. बाराव्या विधानसभेच्या तुलनेत आमदारांच्या सरासरी गुणांमध्ये घट झाली आहे. बाराव्या विधानसभेत आमदारांची सरासरी 61 गुण होती. चौदाव्या विधानसभेत ती 54 वर आली, तर पंधराव्या विधानसभेत किंचित वाढून 55 झाली आहे.
ही आकडेवारी केवळ चढ-उतार म्हणून पाहता येणार नाही. या आकडेवारीतून आमदारांच्या प्रत्यक्ष कामगिरीचं मोजमाप होत असल्याचं प्रजा फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हस्के यांनी सांगितलं.




