आयपीएलच्या फक्त 3 सामन्यानंतर Points Table मध्ये उलथापालथ
मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएल 2026 चा थरार सुरू झाला असून आतापर्यंत तीन सामने खेळले गेले आहेत. या तिन्ही सामन्यांत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या दिग्गज खेळाडूंनी तसेच युवा तारा वैभव सूर्यवंशी यांनी जबरदस्त कामगिरी करत चाहत्यांची मनं जिंकली.या तिन्ही खेळाडूंनी पहिल्याच सामन्यात आपला दबदबा दाखवावा अशी चाहत्यांची अपेक्षा होती, आणि त्यांनी ती पूर्णही केली. त्यांनी केवळ धावा केल्या नाहीत, तर आपल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर संघाला विजय मिळवून देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली. यामध्ये सर्वात जास्त वैभव सूर्यवंशीने लक्ष वेधून घेतलं. त्याच्या विस्फोटक फलंदाजीमुळे राजस्थान रॉयल्सला शानदार विजय मिळाला आणि संघाने गुणतालिकेत अव्वल स्थानही पटकावलं.

पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने विजय मिळवल्यानंतर तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मोठी कामगिरी करत बाजी मारली. गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नांद्रे बर्गर, जोफ्रा आर्चर आणि रवींद्र जडेजा यांच्या भेदक गोलंदाजीमुळे चेन्नई सुपर किंग्सचा डाव केवळ 127 धावांवर आटोपला.
या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी याने अविश्वसनीय फलंदाजी करत केवळ 15 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या या विस्फोटक खेळीच्या जोरावर राजस्थानने अवघ्या 12.1 षटकांत 2 गडी गमावत लक्ष्य सहज गाठले. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 8 विकेट्सने मिळवलेल्या या दमदार विजयासह राजस्थान रॉयल्सने स्पर्धेची सुरुवात दणक्यात केली.
चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध मिळालेल्या दमदार विजयासह राजस्थान रॉयल्सने 2 गुण मिळवत आपलं खाते उघडलं. हे 2 गुण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्सच्या बरोबरीचेच आहेत, कारण त्यांनीही आपले पहिले सामने जिंकले आहेत. मात्र राजस्थानचा विजय खास ठरतो, कारण त्यांनी लक्ष्य अतिशय वेगाने गाठत नेट रन रेट (NRR) मध्ये मोठी आघाडी घेतली. या विजयासह राजस्थानचा NRR थेट 4.171 वर पोहोचला आणि त्यांनी आरसीबीला मागे टाकत गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले. सध्या बंगळुरूचा नेट रन रेट 2.907 असून ते दुसऱ्या स्थानावर आहेत, तर मुंबई इंडियन्स 0.687 नेट रन रेट सह तिसऱ्या स्थानावर आहेत.
राजस्थान रॉयल्सला या हंगामातील तिसऱ्या सामन्यात जसा मोठा फायदा झाला, तसाच मोठा फटका चेन्नई सुपर किंग्सला बसला. सीएसकेने केवळ सामना गमावला नाही, तर नेट रन रेट (NRR)च्या बाबतीतही मोठं नुकसान सहन करावं लागलं. या पराभवानंतर चेन्नईचा नेट रन रेट-4.171 वर घसरला आहे, जो सुधारण्यासाठी त्यांना संपूर्ण हंगाम झटावं लागू शकतं. सध्या चेन्नई सहाव्या स्थानावर आहे, मात्र उर्वरित चार संघांनी आपले सामने खेळल्यानंतर सीएसके थेट तळाशी घसरण्याचीही शक्यता आहे.




