आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा? मंदिरासमोर चटईवर रुग्णांवर उपचार; रोहित पवारांचा हल्लाबोल
मुंबई (प्रतिनिधी) : परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील पिंपराळा गावातून आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. अतिसारसदृश आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांवर गावातील मंदिरासमोर चटई अंथरून उपचार करण्यात आल्याचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 13 जूनपासून गावातील अनेक महिला आणि पुरुषांना जुलाब, पोटदुखी आणि अशक्तपणाचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला आशा वर्करमार्फत प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र रुग्णसंख्या वाढत गेल्याने चारठाणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथक गावात दाखल झाले. यावेळी काही रुग्णांना गावातील हनुमान मंदिरासमोरच चटईवर झोपवून सलाईन लावण्यात आल्याचे दिसून आले.
या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी संबंधित छायाचित्रे शेअर करत राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मतदारसंघातील आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.दरम्यान, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांच्या आग्रहास्तव आणि त्यांच्या सोयीसाठी गावातच उपचार करण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. गावात गेल्या चार दिवसांत सुमारे 65 ते 70 नागरिकांना या आजाराची लागण झाल्याची माहिती समोर आली असून काही रुग्णांना पुढील उपचारासाठी चारठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, गावातील विहिरीचे दूषित पाणी पिल्यामुळे हा आजार पसरल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अहवालाची प्रतीक्षा आहे.या घटनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी संबंधित परिसर राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांच्या कार्यक्षेत्रात येत असल्याचा दावा करत विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणावर आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.




