आश्रमशाळेतील 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; गडचिरोलीत धक्कादायक घटना, मध्यरात्री नेमकं काय घडलं?
गडचिरोली (प्रतिनिधी) : गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई निवासी आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू, तर तीन विद्यार्थिनी जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दीपिका लकडा, सुष्मिता मंडल आणि अनु कोरेटी अशी मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थिनींची नावे आहेत.

विद्यार्थिनी जेवणानंतर झोपल्या असताना रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांना सर्पदंश झाल्याचे समोर आले. घटनेनंतर सर्व विद्यार्थिनींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, धानोरा रुग्णालयात उपचारादरम्यान इयत्ता सहावीतील दीपिका लकडा आणि इयत्ता आठवीतील सुष्मिता मंडल या दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. त्यानंतर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना इयत्ता दुसरीतील अनु कोरेटी हिचाही मृत्यू झाला.
दरम्यान, इयत्ता पाचवीतील दीपिका मदवी, सहावीतील कविता किरंगा आणि इयत्ता आठवीतील समृद्धी नैताम या तीन विद्यार्थिनींवर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी समृद्धी सुरेश नैताम हिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.




