उपनेतेपदावरुन हकालपट्टी झाली, कोण आहेत राघव चड्डा ?
मुंबई (प्रतिनिधी) : आम आदमी पार्टीचे आक्रमक नेते आणि राज्यसभा खासदार राघव चड्डा सध्या दोन कारणांमुळे चर्चेत आहेत. पहिले म्हणजे, पक्षाने त्यांना राज्यसभेतील 'उपनेते' पदावरून हटवून अशोक कुमार मित्तल यांच्याकडे ही धुरा सोपवली आहे. दुसरे म्हणजे, या बदलानंतर त्यांनी 'इव्हिल आय' इमोजीसह शेअर केलेली एक खास पोस्ट. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात राघव चड्डा यांची राजकीय कारकीर्द

राघव चड्डा यांचे वैयक्तिक आयुष्य एखाद्या चित्रपटाप्रमाणे रंजक आहे. व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट (CA) असलेले राघव यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून (LSE) उच्च शिक्षण घेतले आहे. 2011 मध्ये त्यांनी 'आयसीएआय'मधून सीएची पदवी मिळवली. 24 सप्टेंबर 2023 रोजी उदयपूरमध्ये राघव चड्ढा आणि बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. लंडनमध्ये शिक्षणादरम्यान झालेली त्यांची मैत्री पुढे प्रेमात बदलली. या हाय-प्रोफाईल लग्नामुळे राघव चड्ढा राष्ट्रीय स्तरावर घराघरात पोहोचले. परिणीती अनेकदा संसदेच्या गॅलरीत बसून राघव यांचे भाषण ऐकताना दिसते, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.
2015 मध्ये अवघ्या 26 व्या वर्षी त्यांची 'आप'चे राष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणून निवड झाली. अरविंद केजरीवाल यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. 2020 मध्ये राजेंद्र नगर मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार झाले. पंजाब विधानसभा निवडणुकीत 'आप'ला मिळालेल्या ऐतिहासिक विजयात प्रभारी म्हणून राघव चड्डा यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या या कार्याची पावती म्हणून एप्रिल 2022 मध्ये त्यांची पंजाबमधून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली.
दरम्यान,आम आदमी पार्टी ने गुरुवारी खासदार राघव चड्डा यांना राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटवले आहे. त्यांच्या जागी राज्यसभा खासदार अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयाची माहिती पक्षाने राज्यसभा सचिवालयाला दिली असून, पत्रात चड्डा यांना सभागृहात पक्षाच्या वतीने बोलण्यासाठी वेळ देऊ नये, असे नमूद करण्यात आले आहे. राघव चड्डा हे 2022 पासून पंजाबमधून राज्यसभेचे खासदार आहेत आणि त्यांचा कार्यकाळ 2028 मध्ये संपणार आहे. या निर्णयामागील कारण पक्षाने स्पष्ट केलेले नाही. मात्र, चड्डा काही काळापासून पक्षापासून दूर असल्याची चर्चा होती आणि त्यांनी ‘आप’बाबत सार्वजनिक भूमिका मांडलेली नव्हती.




