उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मानलेल्या बहिणीने सोडली साथ ; राष्ट्रवादीत केला प्रवेश

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मानलेल्या बहिणीने सोडली साथ ; राष्ट्रवादीत केला प्रवेश

मुंबई - महाबळेश्वर नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना अचानक वेग आला. शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहीण मानलेल्या माजी नगरसेविका विमल ओंबळे यांनी प्रभाग क्रमांक ४ मधील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

अलीकडील सातारा दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वरातील ओंबळे यांच्या राजकीय जबाबदारीची सूत्रे शिवसेना पदाधिकारी कुमार शिंदे यांच्याकडे सोपवली होती. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर कुमार शिंदे यांनी ओंबळे यांच्या पाठीशी न राहता प्रतिस्पर्धी विमल बिरामणे यांना पाठिंबा दिला. ही बाब ओंबळे यांनी शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवली; परंतु सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या ओंबळे यांनीच शिवसेनेचा त्याग करून राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने शिंदे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. महाबळेश्वर पालिकेत त्या पूर्वी नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. नगराध्यक्षपदासाठी एकूण ९ अर्ज दाखल झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने अंतिम क्षणी सुनील शिंदे यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे नाराज होऊन नासीर मुलाणी यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या मध्यस्थीने त्यांनी अर्ज मागे घेतला. आता नगराध्यक्षपदासाठी सुनील शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस), डी. एम. बावळेकर (लोकमित्र जनसेवा आघाडी), कुमार शिंदे, सतीश साळुंखे आणि संजय पाटील यांच्यात चुरस होणार आहे.

दरम्यान, राज्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाला महाबळेश्वरात पूर्ण पॅनेलही उभे करता आले नाही. भाजपाचे फक्त तीन उमेदवार कमळ चिन्हावर स्पर्धेत आहेत. तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेलाही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसून अनेक इच्छुकांनी अपक्ष म्हणूनच अर्ज भरले आहेत.