करवीर पोलिसांची धडक कारवाई: चोरीचे पैसे गोव्यात कॅसिनोमध्ये उडवणाऱ्या आरोपीला अटक
कोल्हापूर (प्रतिनिधी) : घरफोडीतील चोरी गेलेले १८ लाख ९७ हजार ३५० रुपये किमतीचे तब्बल १३.८ तोळे (१३८ ग्रॅम) सोन्याचे दागिने अवघ्या ४८ तासांच्या आत हस्तगत करत करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याने चोरीचे दागिने विकून आलेले पैसे गोव्यात कॅसिनोमध्ये जुगार खेळून उडवल्याची कबुली दिली आहे.आदित्य संजय चौगुले (वय २१, रा. सूर्यनगरी, हणमंतवाडी रोड, शिंगणापूर, ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आतिश संजय चौगुले यांच्या घरातून ऑक्टोबर २०२५ ते २९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सुमारे १८.९७ लाखांचे सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. याप्रकरणी ३० ऑगस्ट २०२६ रोजी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्ह्यातील चोरीचे गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना संशयित आदित्य चौगुले याला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र पोलिसांनी पोलिसी हिसका दाखवून कौशल्यपूर्ण तपास करताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चोरीचे दागिने विकून आलेले पैसे गोव्यातील कॅसिनोमध्ये जुगार खेळून उडवल्याचे त्याने सांगितले.
पोलीस पंचनाम्यादरम्यान आरोपीकडून १३८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. यामध्ये मंगळसूत्र-१, लक्ष्मीहार-१, अंगठ्या-६, चेन-४, कर्णफुले-१ जोड आणि कानातील रिंगा साखळीसह १ जोड अशा दागिन्यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास पोवार करत आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक सुहास पोवार, पोलीस अंमलदार विजय तळस्कर, महेश बांबळे, रणजित पाटील, प्रकाश कांबळे, प्रवीण बोरचाटे, श्रीधर जाधव, सोमराज पाटील, अमोल चव्हाण आणि आत्माराम शिंदे यांच्या पथकाने केली. पोलिसांच्या या जलद कामगिरीमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.




