केतन अग्रवाल हत्या प्रकरणात 'राजा रघुवंशी केस'चा संदर्भ; नेमकं काय आहे हे गाजलेलं प्रकरण?

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात 'राजा रघुवंशी केस'चा संदर्भ; नेमकं काय आहे हे गाजलेलं प्रकरण?

पुणे (प्रतिनिधी) : लोहगडावरून व्यावसायिक केतन अग्रवाल यांना ढकलून हत्या केल्याच्या प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मोबाईलमधील चॅट, कॉल रेकॉर्ड, लोकेशन आणि इंटरनेट सर्च हिस्ट्री हे या तपासातील महत्त्वाचे डिजिटल पुरावे ठरत आहेत. या आधारे तपास अधिक सखोल करण्यात येत असून, संबंधित पुरावे न्यायालयात सादर केले जाणार आहेत.

तपास यंत्रणांचा दावा आहे की, आरोपी सिया गोयलने कथित गुन्ह्यापूर्वी पॉडकास्ट, व्हिडिओ आणि वेब सिरीजच्या माध्यमातून गुन्हा कसा केला जातो, याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. तसेच देशातील विविध गाजलेल्या हत्याकांडांचा अभ्यास करून संशय कमी येईल अशा पद्धतींबाबतही माहिती गोळा केल्याचा आरोप आहे.

याच दरम्यान, देशभरात चर्चेत आलेल्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणाची माहितीही तिने शोधल्याचे तपासात समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे. विशेष म्हणजे, त्या प्रकरणातील आरोपी सोनम रघुवंशीला जामीन कसा मिळाला आणि त्याचा आपल्या प्रकरणात काही उपयोग होऊ शकतो का, याबाबतही माहिती शोधल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजा रघुवंशी प्रकरण चर्चेत आले आहे.

मध्य प्रदेशातील इंदूर येथील राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांचा विवाह 11 मे 2025 रोजी झाला होता. लग्नानंतर दोघे हनिमूनसाठी मेघालयला गेले. 23 मे रोजी सोहरा (चेरापुंजी) परिसरातून दोघे अचानक बेपत्ता झाले. सुरुवातीला अपघात किंवा अपहरणाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.मात्र, 2 जून रोजी वेई सॉडॉन्ग धबधब्याजवळील खोल दरीत राजा रघुवंशी यांचा मृतदेह आढळल्यानंतर प्रकरणाला मोठे वळण मिळाले. तपासादरम्यान विशेष तपास पथकाने (SIT) सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल डेटा, कॉल रेकॉर्ड आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास केला.

पोलिसांच्या आरोपानुसार, सोनम रघुवंशीने तिचा कथित प्रियकर राज कुशवाह आणि इतर साथीदारांच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचला. या प्रकरणात अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून, शस्त्रे आणि डिजिटल पुरावेही जप्त करण्यात आले आहेत.

या हत्याकांडाची देशभरात मोठी चर्चा झाली होती. राजा रघुवंशी यांच्या कुटुंबीयांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली, तर सोनमच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला तिच्यावरील आरोप नाकारत स्वतंत्र तपासाची मागणी केली होती.दरम्यान, या प्रकरणात जामिनासंदर्भातही महत्त्वाच्या कायदेशीर घडामोडी घडल्या. मात्र, हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असून, आरोपींवरील आरोप न्यायालयात सिद्ध होणे बाकी आहे. अंतिम निर्णय न्यायालयाकडून येणे अद्याप शिल्लक आहे.