कोल्हापूर जिल्हा परिषद कृषी समितीची बैठक संपन्न: योजना व खत-बियाणे उपलब्धतेचा घेतला आढावा

कोल्हापूर जिल्हा परिषद कृषी समितीची बैठक संपन्न: योजना व खत-बियाणे उपलब्धतेचा घेतला आढावा

कोल्हापूर/प्रतिनिधी: जिल्हा परिषद कोल्हापूरच्या कृषी समितीची महत्त्वाची बैठक आज, मंगळवारी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील तथा कृषी समितीचे सभापती यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील पीक पेरणी क्षेत्र, रासायनिक खते व बियाण्यांची उपलब्धता, तसेच विविध शासकीय आणि सेस फंड योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

 

बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे घोडके यांनी जिल्ह्यातील पीक पेर क्षेत्राबाबतचा सविस्तर आढावा सादर केला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा प्रगती अहवाल जिल्हा कृषी अधिकारी (वि.घ.यो.) वाघ यांनी मांडला. जिल्ह्यात सध्या उपलब्ध असलेल्या रासायनिक खतांच्या व बियाण्यांच्या साठ्याबाबत मोहीम अधिकारी सुशांत लव्हटे यांनी माहिती दिली.

जिल्हा परिषद सेस फंड अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या योजनांची दर निश्चिती आणि त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांनी सविस्तर सादरीकरण करून उपस्थितांना माहिती दिली.

यावेळी मार्गदर्शन करताना उपाध्यक्ष तथा सभापती यांनी, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि लाभार्थी संख्येत वाढ करण्यासाठी प्रत्येक तालुक्याने विशेष प्रयत्न करावेत," अशा कडक सूचना दिल्या. तसेच कृषी विभागाच्या सर्व योजनांची व्यापक प्रचार व प्रसिद्धी प्रत्येक गावापर्यंत झाली पाहिजे, जेणेकरून अंतिम घटकातील शेतकऱ्याला याचा प्रत्यक्ष फायदा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीतील विविध विषयांवरील चर्चेमध्ये शिरोळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद कुरणे, चंदगड पंचायत समितीचे सभापती नाईक, कागल पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा पाटील, भुदरगडचे सभापती विक्रमसिंह पाटील, शाहूवाडीच्या सभापती प्रियंका भोसले आणि ह. मो. पाटील यांनी सक्रिय सहभाग नोंदवून महत्त्वाच्या सूचना मांडल्या.