खरातची माहिती दिवाळीमध्येच मुख्यमंत्र्यांकडे, सहा महिने झोपा काढल्या काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
मुंबई (प्रतिनिधी) : दिवाळीच्या आसपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची माहिती मिळाली होती. ऑक्टोबर, नोव्हेंबरपासूनच खरातचे गैरव्यवहार चव्हाट्यावर आले, गृहविभाग पुरावेही गोळा करत होते, मग मुख्यमंत्री सहा महिने झोपा काढत होते का?, असा संतप्त सवाल उपस्थित करून खरात प्रकरणाने जी विकृत चर्चा सुरु आहे ती महाराष्ट्रासाठी चांगली नाही. एसआयटीला अधिकची कुमक द्या, टास्क फोर्स लावा आणि दोषींना गडाआड करून या खरात प्रकरणाचा शेवट करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

बुलढाणा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, अशोक खरातचे प्रकरण अंधश्रद्धेतून निर्माण झाले आहे, यातून आपण धडा घेतला पाहिजे, वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगला पाहिजे. अंधश्रद्धा कोण वाढवत आहे, धर्माधर्मात, जाती जातीत वाद कोण निर्माण करत आहे. द्वेष कोण निर्माण करत आहे, हे सर्वांना माहित आहे. यातूनच खरात सारख्या विकृती जन्माला येतात याची दखल घेतली पाहिजे. २०२४ पासून देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांच्याच काळात अशोक खरात सारख्या विकृतीने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. आताही जाणीवपूर्वक हे प्रकरण रेंगाळत ठेवण्याचे काम मुख्यमंत्री करत आहेत. मित्रपक्षांना जेरीस आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, हे निषेधार्ह आहे. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला आहे पण इतर सर्व संबंधितांचे काय, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई केली पाहिजे. खरातशी संबंधित असलेल्यांना जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे, असेही सपकाळ म्हणाले.
समाजभान गुंडाळून ठेवल्यानेच खरात सारखे विकृत निर्माण होतात, खरात प्रकरणात काही जण अंधश्रद्धेचे बळीही ठरले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मुलनासाठी आयुष्यभर लढा दिला, त्यांचे काम पुढे घेऊन गेले पाहिजे व अंधश्रद्धा निर्मूलनाचा संकल्प केला पाहिजे, जेणेकरून खरात सारखी विकृती महाराष्ट्रात पुन्हा निर्माण होणार नाही, असेही सपकाळ म्हणाले.
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीतच जुंपली असून मंत्री शंभुराजे देसाई व मकरंद पाटील या दोन मंत्र्यांना पोलिसांनीच मारहाण केली, असे तेच सांगत आहेत. महाराष्ट्रात मंत्रीच मार खात आहेत, हे लोकशाही रसातळाला गेल्याचा मोठा पुरावा आहे तसेच साताऱ्यात जे झाले त्यातून वोट चोरीवर शिक्कामोर्तब झाले आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.




