गिरीश महाजनांची मध्यस्थी फळाला; प्रसाद हिरे महायुतीसोबत, दराडेंना पाठिंबा

गिरीश महाजनांची मध्यस्थी फळाला; प्रसाद हिरे महायुतीसोबत, दराडेंना पाठिंबा

मुंबई (प्रतिनिधी) : उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीने आता एक अत्यंत मोठे वळण घेतले आहे. अधिकृतपणे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस उलटून गेल्यानंतरही महायुतीमधील बंडखोरी शमवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना अखेर यश आले असून, नाशिकमधील भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी आपली माघार जाहीर केली आहे.

आज सोमवारी नाट्यमय घडामोडी घडत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे हे थेट मंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीसाठी दाखल झाले. विशेष म्हणजे, शिवसेनेच्या या दोन्ही मंत्र्यांसोबत भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे हे देखील उपस्थित होते. या दिग्गज नेत्यांच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्यानंतर प्रसाद हिरे यांनी महायुतीच्या हितासाठी माघार घेत असल्याचे जाहीर केले. यामुळे महायुतीसमोरील एक मोठा अडथळा दूर झाला आहे.

प्रसाद हिरे यांच्या माघारीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, आमचे दोन्ही उमेदवार मागे घेणार हे सुरुवातीपासून सांगत होतो. प्रसाद हिरे यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यामुळे त्यांनी आता महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. नाशिकचा प्रश्न मिटला की जळगावचा प्रश्न सुटेल. गोकुळ गिते यांच्यासोबत फोनवर चर्चा सुरू आहे, सायंकाळी निर्णय होईल. विधान परिषद निवडणुकीच्या 17 पैकी 17 जागा महायुतीचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.