गोकुळ निवडणूक : उच्च न्यायालयाच्या निर्णयाने ६६७ दूध संस्थांना मतदानाचा अधिकार; सत्ताधारी गटात जल्लोष

गोकुळ निवडणूक : उच्च न्यायालयाच्या निर्णयाने ६६७  दूध संस्थांना मतदानाचा अधिकार; सत्ताधारी गटात जल्लोष

प्रतिनिधी / कोल्हापूर: ‘गोकुळ’ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निकाल दिला आहे. अवसायनातील ४९२ दूध संस्था आणि कार्यक्षेत्राबाहेरील ठरावधारक म्हणून तक्रार झालेल्या १७५ दूध संस्था, अशा एकूण ६६७ दूध संस्थांना मतदानास पात्र ठरवण्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालामुळे गोकुळच्या सत्ताधारी गटाला मोठा दिलासा मिळाला असून, विशेषत: ४९२संस्था पात्र ठरल्याने राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासाठी हा एक मोठा राजकीय दिलासा मानला जात आहे. 

निकालाची माहिती समजताच गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रचाराच्या गडहिंग्लज दौऱ्यावर असलेल्या सत्ताधारी संचालक मंडळाने आणि कार्यकर्त्यांनी मोठा आनंद व्यक्त केला. यामध्ये माजी अध्यक्ष विश्वास नारायण पाटील (आबाजी), माजी अध्यक्ष नविद मुश्रीफ, संचालक युवराज पाटील (बापू), अजित नरके, डॉ. सुजित मिणचेकर, नंदकुमार ढेंगे, बाळासाहेब खाडे, रणजितसिंह पाटील, किसन चौगले, अमरसिंह पाटील, एस. आर. पाटील, तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश पाटील - गिजवणेकर, राहुल शिरकोळी, विजय दाभाडे आणि शिवराज पाटील यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी एकत्र येत पेढे वाटून आणि घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.

उच्च न्यायालयाच्या या निकालामुळे ६६७ दूध संस्थांचे मतदान हक्क अबाधित राहिल्याने गोकुळ निवडणुकीतील सत्ताधारी गटाची ताकद अधिक वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.