'गोमूत्र पाजलं, अघोरी कृत्य अन् ७ वर्षे छळ'; विनायक राऊतांच्या सूनेचे खळबळजनक आरोप; माजी खासदारांनी दिले चोख उत्तर

'गोमूत्र पाजलं, अघोरी कृत्य अन् ७ वर्षे छळ'; विनायक राऊतांच्या सूनेचे खळबळजनक आरोप; माजी खासदारांनी दिले चोख उत्तर

ठाणे: ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबातील वाद आता पोलीस ठाण्यात आणि थेट चव्हाट्यावर आला आहे. विनायक राऊत यांचे सुपुत्र आणि नगरसेवक गितेश राऊत यांच्या पत्नी गिरीजा राऊत यांनी सासरच्या मंडळींविरोधात गंभीर आरोप करत ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी गिरीजा यांनी घेतलेली पत्रकार परिषद आणि विनायक राऊत यांनी दिलेले स्पष्टीकरण यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे.

'बळजबरीने गोमूत्र पाजले, केस कापले'; सूनेचे धक्कादायक आरोप
गिरीजा राऊत यांनी पत्रकार परिषदेत आपल्यासोबत घडलेली आपबिती सांगताना अत्यंत हादरवणारे दावे केले आहेत. गेल्या ७ वर्षांपासून आपला शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. "मला घरात बळजबरीने गोमूत्र पिण्यास दिले गेले. इतकेच नाही तर राऊत कुटुंबातील सदस्यांनी अत्यंत क्रूरतेने माझे डोके कापले," असा खळबळजनक आरोप गिरीजा यांनी केला आहे. या संपूर्ण अघोरी कृत्य आणि जादूटोणा प्रकरणात राऊत कुटुंबासह फिरोज बाबा आणि काजी बाबा यांच्या विरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

विनायक राऊत दुसऱ्या पत्नीसोबत राहतात
पत्रकार परिषदेत गिरीजा यांनी विनायक राऊत यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही भाष्य केले. त्या म्हणाल्या, "विनायक राऊत हे कधीच आमच्यासोबत राहत नव्हते. आम्ही मुंबईत एका चाळीतल्या घरात राहायचो, तर विनायक राऊत हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीसोबत दुसऱ्या घरात राहतात. त्यांनी हे दुसरे लग्न आणि दुसरे घर माझ्यापासून लपवून ठेवले होते." नवरात्रीच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी म्हणजेच दसऱ्यालाच ते घरी यायचे, अन्यथा फोनवरूनच विविध जबाबदाऱ्यांबद्दल सांगायचे, असेही गिरीजा म्हणाल्या.

कपड्यांवर बंधनं आणि वैवाहिक आयुष्यातील तक्रारी
आपल्या तक्रारीत गिरीजा यांनी पती गितेश राऊत यांच्यासोबतच्या संबंधांवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. लग्नानंतर उटी येथे हनिमूनला गेले असता ६ दिवसांत गितेशने शारीरिक संबंध न ठेवता दूर राहणे पसंत केले. विचारणा केली असता, "शारीरिक संबंध महत्त्वाचे नाहीत, मेंटल कनेक्ट गरजेचा आहे," असे उत्तर देऊन टाळाटाळ केल्याचा आरोप गिरीजा यांनी केला. तसेच विनायक राऊत यांच्या राजकीय वजनामुळे आपण इतकी वर्षे गप्प राहिलो, मात्र सासरच्या छळाला कंटाळून अखेर कायदेशीर पाऊल उचलल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विनायक राऊतांनी सर्व आरोप फेटाळले; पैशांच्या मागणीचा दावा
सून गिरीजा यांनी केलेल्या आरोपांनंतर माजी खासदार विनायक राऊत यांनी तातडीने समोर येत हे सर्व दावे खोटे असल्याचे सांगितले. राऊत म्हणाले, "माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर लावलेले सर्व आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आहेत. माझे सुपुत्र गितेश आणि गिरीजा गेल्या तीन वर्षांपासून एकत्र राहतच नाहीत. जर २०१८ मध्ये ही घटना घडली होती, तर २०२६ मध्ये तक्रार का केली जात आहे? यामागे काहीतरी वेगळेच शिजत आहे."

पुढे बोलताना विनायक राऊत यांनी पैशांच्या मागणीचा मोठा दावा केला. "सध्या दोघांचा न्यायालयात घटस्फोटाचा खटला सुरू आहे. गिरीजा यांनी नोटीस पाठवून दरमहा ५ लाख रुपये खर्च, मानसिक छळापोटी १० कोटींपेक्षा अधिक रक्कम आणि २ कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे. याशिवाय ५ रूमचे घर आणि ऑटोमॅटिक गाडीचीही मागणी करण्यात आली होती. या अवास्तव मागण्या आम्ही पूर्ण करू शकत नसल्याचे स्पष्ट झाल्यावरच तिने ही खोटी तक्रार दाखल केली आहे," असे विनायक राऊत म्हणाले. तसेच त्यांनी कोणत्याही अघोरी उपचारांचे खंडन करत आपण न्यायालयात कायदेशीर लढाई लढत असल्याचे सांगितले. या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता कापूरबावडी पोलीस करत आहेत.