'एमआयडीसी हटवा, गाव वाचवा!' कोल्हापुरात ग्रामस्थ आक्रमक

'एमआयडीसी हटवा, गाव वाचवा!' कोल्हापुरात ग्रामस्थ आक्रमक

कोल्हापूर/प्रतिनिधी : "जय जवान, जय किसान... एमआयडीसी हटवा, गाव वाचवा" अशा घोषणा देत कोल्हापूरच्या सैनिक टाकळीमध्ये प्रस्तावित एमआयडीसी विरोधातील जनआंदोलन आता पेटलं आहे. एमआयडीसीच्या विरोधात ग्रामस्थांनी दसरा चौकात 'रास्ता रोको' करत प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं आणि आता थेट लोकप्रतिनिधींच्या घराकडे मोर्चा वळवण्याचा इशारा दिलाय.

सैनिक टाकळी येथे प्रस्तावित असलेल्या एमआयडीसीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. नागरिकांना अंधारात ठेवून, नियमबाह्य पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जात असल्याचा थेट आरोप आंदोलकांनी केला आहे. याच संतापातून आज गावात भव्य निषेध फेरी काढण्यात आली आणि दसरा चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाची दखल घेत शिरोळचे नायब तहसीलदार आणि एमआयडीसीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे, दीपक पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांनी प्रशासकीय कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. अखेर एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर आणि मागण्यांचे निवेदन वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवल्याचे पुरावे मिळाल्यानंतर, हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले. शहीद जवान अर्जुन बिरणगे यांच्या वीर पत्नी अर्चना बिरणगे यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना साखर-पाणी देऊन उपोषण सोडण्यात आले.

उपोषण जरी तात्पुरते स्थगित झाले असले, तरी ग्रामस्थांचा लढा संपलेला नाही. एमआयडीसीची प्रक्रिया पूर्णपणे रद्द करण्यासाठी  थेट स्थानिक आमदारांच्या निवासस्थानी भव्य मोर्चा काढण्याचा इशारा शेकडो ग्रामस्थांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर कुरुंदवाड पोलिसांनी परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.