गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी केला तुफान राडा ; व्हिडिओ व्हायरल
वर्धा - लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील नेहमीच चर्चेत असते आणि तिच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी जमते. मात्र, अनेकदा ही गर्दी नियंत्रणाबाहेर जाते. वर्धा येथे आयोजित वर्धा सांस्कृतिक महोत्सव २०२५ मध्येही अशीच घटना घडली. पैशाने तिकीट घेऊनही कार्यक्रम नीट पाहता येत नसल्याची प्रेक्षकांनी तक्रार केली आणि त्यातूनच मोठा गोंधळ निर्माण झाला. मागच्या बाजूला बसलेल्या प्रेक्षकांना स्टेजवरील नृत्य व्यवस्थित दिसत नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.

सुरुवातीला आयोजकांना प्रश्न विचारण्यात आले, पण परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने काही युवकांनी धुडगूस घालण्यास सुरुवात केली. या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, काही प्रेक्षकांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्याचे, तसेच खुर्च्यांची तोडफोड केल्याचे दृश्य दिसत आहेत.
स्वावलंबी मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात गौतमी आणि तिच्या टीमने ‘व्हर्सेटाइल ड्युओ’ बँडसोबत नृत्य सादर केले होते. वाढत्या गोंधळामुळे कार्यक्रमस्थळी काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं. अखेर पोलीसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि गौतमी पाटीलचा कार्यक्रम काही वेळासाठी थांबवावा लागला.
गोंधळ शांत करण्यासाठी बाउन्सर्सना मैदानात उतरवण्यात आलं, पण त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडल्याची माहिती समोर आली आहे. अपुरी व्यवस्था आणि सुरक्षा नसल्याने कार्यक्रमाची वाट लागल्याची टीका प्रेक्षकांनी आयोजकांवर केली. नंतर पोलिसांनी प्रेक्षकांना बाहेर काढून परिसर शांत केला.




