चेंबूर दुर्घटना अहवालावर मनसेचा संताप

चेंबूर दुर्घटना अहवालावर मनसेचा संताप

मुंबई (प्रतिनिधी) : चेंबूरमधील झाड दुर्घटनेच्या चौकशी अहवालावरून आता राजकारण तापलं आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी अहवालावर तीव्र नाराजी व्यक्त करत, हा अहवाल दोषींना वाचवण्यासाठी तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे.

देशपांडे म्हणाले, हा अहवाल म्हणजे "चोरांनी चोरांना निर्दोष ठरवण्यासाठी तयार केलेला अहवाल" असून, प्रत्यक्ष जबाबदार अधिकाऱ्यांना क्लीनचीट देण्यात आली आहे. झाडांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई का झाली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

त्यांनी पुढे सांगितले की, 2024 मध्येच ट्रि रिस्क असिसमेंटबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही त्या अमलात आणल्या गेल्या नाहीत. संबंधित झाडाचा सर्व्हे रिपोर्ट सार्वजनिक करण्याची मागणी करत, टेंडरच्या अटींचे पालन झाले का, याचाही खुलासा व्हावा,अशी मागणी त्यांनी केली.

महानगरपालिकेच्या चौकशी अहवालात कंत्राटदार आणि सल्लागार संस्थेवर दंडाची शिफारस करण्यात आली असली, तरी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना क्लीनचीट देण्यात आल्याने देशपांडे यांनी आक्षेप नोंदवला. संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन व्हावे, अशीही त्यांनी मागणी केली.

यावेळी त्यांनी प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरही प्रश्न उपस्थित करत, एका निष्पाप मुलाचा जीव गेल्यानंतरही जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होत नसल्याची टीका केली. दोषींवर कारवाई होईपर्यंत मनसे शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.