जंतर-मंतर आंदोलनावर चंद्रकांत पाटील यांचा दावा; 'दगडांवरील फुटप्रिंटचाही तपास सुरू'
मुंबई (प्रतिनिधी) : दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनानंतर सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्ज आणि पेलेट गनच्या वापरावरून करण्यात येणाऱ्या आरोपांवर त्यांनी भाष्य केले.

राहुल गांधी आणि कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, लोकशाहीत आरोप करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र आरोप केले म्हणजे ते सत्य ठरत नाहीत. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा सविस्तर अहवाल तयार केला असून त्यात अनेक बाबींचे विश्लेषण करण्यात आले आहे.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी एका मुक्त पत्रकाराच्या व्हिडिओचा उल्लेख करत दावा केला की, दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतर परिसरातील प्रत्येक दगड तपासासाठी जप्त केला असून, त्यावरील फुटप्रिंटचा देखील तपास सुरू आहे. मात्र, या दाव्याची अधिकृतपणे स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.
अभिजीत दीपके यांनी धमक्या मिळत असल्याचा दावा केल्याबाबतही पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. "धमक्या येत असतील तर त्यांनी पोलिसांकडे तक्रार करावी किंवा न्यायालयात दाद मागावी. धमकी देणारा भाजपचाच आहे, हे सिद्ध होणेही आवश्यक आहे," असे ते म्हणाले.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात आरोप-प्रत्यारोपांपेक्षा पुराव्यांच्या आधारे सत्य समोर येणे गरजेचे असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.




