काँग्रेसशी जवळीक वाढल्याची चर्चा अन् रोहित पवारांची राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीला दांडी; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून राज्यभर दौरे आणि आंदोलनांमध्ये सहभागी होण्याचा सपाटा लावणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार सध्या चांगलेच चर्चेत आहेत. अलीकडच्या काळात त्यांची काँग्रेस पक्षाशी वाढलेली जवळीक हा चर्चेचा विषय ठरत आहे. अशातच शनिवारी रोहित पवार यांनी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या शरद पवार गटाच्या कोअर कमिटीच्या बैठकीला दांडी मारल्याने नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार हे त्यांना न पटलेल्या पक्षाच्या काही धोरणांपासून अंतर राखताना दिसत आहेत. त्यात आता रोहित पवार आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे. याबाबत रोहित पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो होऊ शकला नाही. मात्र, रोहित पवार यांनी याबाबत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना कल्पना दिल्याचं सांगितलं जात आहे. तरीही रोहित पवार यांची कोअर कमिटीच्या बैठकीतील गैरहजेरी नेमकं काय सूचित करते, याबाबत राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू आहे.
एकीकडे काँग्रेससोबत रोहित पवारांची जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीला रोहित पवार गैरहजर राहिल्याने त्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. कोअर कमिटीच्या बैठकीला जितेंद्र आव्हाड, हर्षवर्धन पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी आमदार अशोक पवार, राजेंद्र शिंगणे, अनिल देशमुख आणि खासदार निलेश लंके उपस्थित आहेत.
या बैठकीत दहा दिवसांपूर्वी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांसोबत झालेल्या बैठकीतील विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या बैठकीला शरद पवार आणि कोअर कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित आहेत. याच बैठकीत दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत काही चर्चा होते का? किंवा पक्ष NDA सोबत जाण्याबाबत काही विचारविनिमय होतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.रोहित पवार यांचा भाजपसोबत हातमिळवणी करून NDA आघाडीत सहभागी होण्यास विरोध असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे रोहित पवार भविष्यात वेगळा राजकीय विचार करू शकतात, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.




