जरांगे पाटलांचा छगन भुजबळांना पलटवार; म्हणाले, 'कशाला काड्या लावतोस?' घाणेरड्या भाषेच्या आरोपावरून जोरदार प्रत्युत्तर

जरांगे पाटलांचा छगन भुजबळांना पलटवार; म्हणाले, 'कशाला काड्या लावतोस?' घाणेरड्या भाषेच्या आरोपावरून जोरदार प्रत्युत्तर

मुंबई (प्रतिनिधी) : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा बांधवांना अंतरवाली सराटीत येण्याचं आवाहन केलं आहे. उद्या म्हणजेच 12 सप्टेंबर रोजी दुपारी मुंबईला जाण्याचा निर्णय आणि वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे. ही मराठा समाजाच्या अस्तित्वाची लढाई असल्याचं म्हणत केवळ टीव्हीसमोर बसून पाहू नका, हातातील कामं सोडून अंतरवालीत या, असं आवाहन जरांगे पाटलांनी केलं. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जरांगे पाटलांच्या भाषेवरून टीका होत आहे. मंत्री छगन भुजबळ यांनीही जरांगे पाटलांची भाषा घाणेरडी असल्याचं म्हटलं होतं. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याशी चर्चेदरम्यान जरांगे यांनी घाणेरडी भाषा वापरल्याचा आरोप भुजबळांनी केला होता. यावरून आता जरांगे पाटलांनी भुजबळांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

"कशाला काडी लावतो? तुला शिव्या देऊ का मग? तुला काय करायचंय, कुठवर काड्या लावतो?" असं म्हणत जरांगे पाटलांनी भुजबळांवर निशाणा साधला. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याबाबत बोलताना जरांगे म्हणाले की, कलेक्टर संपूर्ण जिल्ह्याच्या आहेत. त्या पालक आहेत, राजकारणी नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांना कोणीही चांगलं किंवा वाईट बोलू शकतं, मात्र त्याचा वेगळा अर्थ काढू नये, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सक्षम अधिकारी असताना लिंगभेदाचा विषय येत नाही. संसारात लिंगभेद असतो, मात्र अधिकाऱ्यांमध्ये लिंगभेद नसतो. जिल्ह्याच्या प्रमुख म्हणून त्यांना सर्वांचं ऐकून घ्यावं लागतं, असं म्हणत जरांगे पाटलांनी आपल्या भाषेवर टीका करणाऱ्यांवर पलटवार केला. दरम्यान, अजय बारस्कर यांच्याकडून मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. यावरही जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली. माझ्या विरोधात बोलणारे आणि केस करणारे खरंच मराठे आहेत का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 "ओरिजनल असेल तर मराठे मराठ्यांच्या विरोधात बोलू शकत नाहीत. दुकानात भेसळ असेल तर काय सांगता? असं म्हणत त्यांनी टीका केली. मुंबईला जाण्याची तारीख ठरल्यास आम्ही एका दिवसात मुंबईला जाऊ. मात्र हे गर्दीवर अवलंबून असेल. गाड्या जास्त असतील तर 10 ते 20 किलोमीटरच्या वेगाने प्रवास करावा लागेल. मागच्या दोन्ही वेळेपेक्षा 25 पट अधिक मराठे मुंबईला जाणार असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.