ऑपरेशन सिंदूरनंतरची गुप्त माहिती फुटली; ट्रम्प यांच्या घोषणेचा माजी CDS अनिल चौहान यांचा गौप्यस्फोट
मुंबई (प्रतिनिधी) : ऑपरेशन सिंदूरनंतर भारत विजयाच्या स्थितीत असताना भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीचा निर्णय झाला. दोन्ही देशांच्या लष्करी मोहिमांचे महानिर्देशक म्हणजेच DGMO स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये याबाबत चर्चा झाली होती.भारत आणि पाकिस्तानमधील ही चर्चा पूर्णपणे दोन्ही देशांच्या DGMO अधिकाऱ्यांमध्येच झाली होती. त्यामध्ये अन्य कोणाचाही सहभाग नव्हता. दुपारी तीन वाजता शस्त्रसंधीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आणि त्यानुसार संध्याकाळी पाच वाजल्यापासून शस्त्रसंधी लागू करण्याचे ठरले होते.

ही चर्चा गुप्त ठेवण्याचेही ठरले होते. मात्र, पाकिस्तानकडून या संभाषणाचा तपशील लीक झाला आणि ही माहिती अमेरिकेला मिळाली. त्यामुळे भारत-पाकिस्तानकडून अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाल्याची घोषणा केली, असा गौप्यस्फोट भारताचे माजी संरक्षणदल प्रमुख अनिल चौहान यांनी केला.दिल्लीत विवेकानंद आंतरराष्ट्रीय फाऊंडेशनच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ऑपरेशन सिंदूरशी संबंधित अनेक महत्त्वाचे खुलासे केले.
दरम्यान, ऑपरेशन सिंदूर सुरू असताना पाकिस्तानचा स्कार्दू हवाई तळ भारतीय वायूदलाच्या निशाण्यावर होता. मात्र, खराब हवामानामुळे तिथे हल्ला करणे शक्य झाले नाही. त्यामुळे भारतीय वायूदलाने ऐनवेळी कराचीतील भोलारी हवाई तळावर हल्ला केला.पाकिस्तानच्या उत्तर ते दक्षिण भागातील अनेक लष्करी तळ भारतीय सैन्याच्या निशाण्यावर होते, असेही अनिल चौहान यांनी सांगितले.कोणत्याही लष्करी मोहिमेत धोका असतो. शत्रूकडून नुकसान होण्याची शक्यताही असते. मात्र, अशा वेळी आत्मविश्वास महत्त्वाचा ठरतो. कोणतेही लष्कर 100 टक्के तयार किंवा परिपूर्ण नसते. शत्रूबाबतची माहितीही कधीच पूर्ण नसते; ती मिळवण्याची प्रक्रिया सतत सुरू असते.
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवसापासून तिन्ही सैन्यदलांनी कोणतीही उणीव जाणवू दिली नाही. सरकार जो निर्णय घेईल, ती मोहीम यशस्वी करून दाखवू, असा विश्वास आम्ही व्यक्त केला होता.उरी हल्ल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक केला होता. पुलवामा हल्ल्यानंतर एअर रुटचा वापर करण्यात आला. मात्र, ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने वेगळी रणनीती वापरत लोअर एअरस्पेसचा वापर केला.
लष्करी कारवाईत एकच रणनीती पुन्हा पुन्हा वापरल्यास यशाची शक्यता कमी होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक वेळी नवीन रणनीतीचा विचार करावा लागतो. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी भारताकडे अनेक पर्याय होते. पाकिस्तानला धडा शिकवायचा होता आणि त्यांच्या अपेक्षेपलीकडची कारवाई करायची होती. त्यासाठी लोअर एअरस्पेसचा पर्याय निवडण्यात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक गोष्ट स्पष्ट केली होती—ही मोहीम तातडीने करण्याचा कोणताही दबाव नाही. वेळ घ्या, मात्र मानवी किंवा तांत्रिक कारणामुळे मोहीम अपयशी ठरता कामा नये. तसेच मोहिमेच्या यशाचे ठोस पुरावेही हवे आहेत, असे मोदींनी सांगितल्याचे अनिल चौहान यांनी नमूद केले.
बालाकोट हवाई हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी आपापले धडे घेतले. भारताने दूरवरून अचूक हल्ले करणे, त्यानंतर झालेल्या नुकसानीची पाहणी करणे आणि त्याचे पुरावे गोळा करण्याचे महत्त्व ओळखले. तर पाकिस्तानने हवाई हल्ल्यांपासून संरक्षणासाठी गुंतवणूक वाढवली आणि आधुनिक युद्धसामुग्री खरेदी केली, असेही अनिल चौहान यांनी सांगितले.




