जि.प. चे सीईओ कार्तिकेयन एस. यांची राज्यस्तरीय समितीवर नियुक्ती
कोल्हापूर( प्रतिनिधी) जिल्हा परिषदेकडून प्राथमिक शाळांमध्ये स्वच्छतेच्या सुविधा उंचावण्यासाठी अभिनव पाऊल उचलण्यात आले आहे. या अंतर्गत काही शाळांमध्ये ग्रेनाइट व मार्बलसारख्या टिकाऊ साहित्याचा वापर करून आधुनिक स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत. विशेषतः मुलींच्या आरोग्याचा विचार करून सुविधा, स्वच्छता व्यवस्थापन आणि सुरक्षितता यांवर भर देण्यात आला आहे. या संदर्भात एक राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील ज्या शाळांमध्ये मुलींची संख्या अधिक आहे, त्या शाळांची प्राधान्याने निवड करण्यात आली. आतापर्यंत सुमारे १०० शाळांमध्ये या प्रकारची स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत. कोल्हापूर स्टाइल इंटिवेटेड स्कूल हेल्थ कॉम्प्लेक्स' उपक्रमासाठी निवड करण्यात आली होती पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह सर्व खासदार आणि आमदारांनी जिल्हा नियोजन समिती आणि वित्त आयोगातून मोठा निधी उपलब्ध करून दिला
.
उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी सुमोटो दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील आदेशान्वये राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील उपलब्ध सुविधांचा आढावा घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश अनुजा प्रभुदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. यासाठी जिल्हा पातळीवरही समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. ६ जानेवारी २०२६ रोजी या समितीच्या बैठकीत केलेल्या सादरीकरणाची दखल घेत कार्तिकेयन यांची समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.




