ट्रोलर्सना फडणवीसांचा इशारा! शिव्या द्या, पण महाराष्ट्राची बदनामी सहन करणार नाही
मुंबई (प्रतिनिधी) : मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई मिसिंग लिंक प्रकल्पावरून सरकारवर जोरदार टीका होत असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विरोधक आणि सोशल मीडियावरील ट्रोलर्सना थेट प्रत्युत्तर दिलं आहे.मिसिंग लिंकवर झालेल्या भूस्खलनानंतर ७ हजार कोटींचा प्रकल्प निकृष्ट असल्याचे आरोप करण्यात आले. मात्र, फडणवीस यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत, "हा पूल तुटलेला नाही, केवळ दरडीचा मलबा कमानीवर आल्याने ती पडली. अवघ्या १८ तासांत वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली," असे स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी सोशल मीडियावरील ट्रोलर्सवरही जोरदार हल्लाबोल केला. "मला शिव्या द्या, त्याची मला सवय आहे. मी शिव्याप्रुफ आहे. पण महाराष्ट्राची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर कोणालाही सोडणार नाही," असा इशारा त्यांनी दिला.फडणवीस पुढे म्हणाले, "आज जे लोक सोशल मीडियावर पैसे घेऊन टीका करत आहेत, ते दहा वर्षांनी दिसणारही नाहीत. मात्र, ही मिसिंग लिंक कायम उभी असेल आणि तिच्यासोबत देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांची नावेही कायम स्मरणात राहतील."
याचवेळी त्यांनी नाशिकमधील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरही नाव न घेता निशाणा साधला. तसेच वसई-विरार, कोकण आणि इतर पावसाने प्रभावित भागातील मदतकार्य, मोबाईल नेटवर्क आणि वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत असल्याची माहितीही सभागृहात दिली.
दरम्यान, मुंबई महापालिकेतील अनावश्यक खर्चाला आळा घालण्यासाठी १,०३२ कोटी रुपयांच्या निविदा रद्द करण्यात आल्याची माहिती देत, जन पोर्टलमुळे कोट्यवधी रुपयांची बचत झाल्याचाही दावा मुख्यमंत्र्यांनी केला.




