ठाकरे दोन लेकरांच्या प्रमोशनसाठी आले, घोषणा द्यायला रोजाने माणसं लावली ; 'तिरंगा रॅली'वरून गुणरत्न सदावर्तेंची घणाघाती टीका

ठाकरे दोन लेकरांच्या प्रमोशनसाठी आले, घोषणा द्यायला रोजाने माणसं लावली ; 'तिरंगा रॅली'वरून गुणरत्न सदावर्तेंची घणाघाती टीका

मुंबई: नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुंबईतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर (शिवाजी पार्क) मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य 'तिरंगा रॅली' पार पडली. या रॅलीला देशभरातील तरुणाईचा आणि 'जेन-झी'चा मोठा प्रतिसाद मिळाला असतानाच, दुसरीकडे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी या संपूर्ण जल्लोषावर आणि ठाकरे बंधूंवर अतिशय बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे.

दोन लेकरांचे प्रमोशन अन् रोजाने आणलेली माणसं - गुणरत्न सदावर्ते

पत्रकार परिषदेत बोलताना ॲड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, "सध्याचे केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या भावना जपणारं सरकार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एसटी कर्मचारी मृत्युमुखी पडले, तेव्हा यांची शपथ कुठे हरवली होती? टीईटी घोटाळा प्रकरणात सरकारने स्वतःहून कारवाई करून आरोपींना गजाआड केले आहे. ठाकरे बंधू आज मैदानात आले ते केवळ आपल्या दोन लेकरांचे (आदित्य आणि अमित ठाकरे) राजकीय प्रमोशन करण्यासाठी आले आहेत. सभेत घोषणा देण्यासाठी रोजंदारीवर माणसं आणली होती."

आदित्याला परत चौथ्या वर्गाची परीक्षा द्यायला लावा

पुढे बोलताना सदावर्ते यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. "आदित्य ठाकरे यांना परत चौथीच्या बोर्डाची परीक्षा द्यायला सांगा. एखादी गोष्ट समजत नसेल तर शिकण्यात गैर काही नाही. सोनम वांगचुक यांना पाठिंबा देताना अभिजीत दिपके यांची जात मध्ये आडवी आली होती का? ही केवळ राजकारणातील रोजबिगारी सुरू आहे," असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

रॅलीत 'जेन-झी' पोस्टर्सची जोरदार चर्चा

एकीकडे सदावर्तेंची टीका सुरू असताना, दुसरीकडे शिवाजी पार्कवर पार पडलेल्या 'तिरंगा रॅली'त तरुणाईचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. या रॅलीतील काही खास पोस्टर्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले:

·         'कमबॅक करना पडेगा!': हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रासह 'जेन-झी' (Gen-Z) शैलीतील डिजिटल फलक चर्चेत राहिला.

·         'दोन वाघांना सलाम': अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे आणि आंदोलनाचा मुख्य चेहरा अभिजीत दिपके यांच्या कौतुकाचा फलक झळकला.

·         इतर आकर्षणे: एका चिमुकलीच्या हातातील राजकीय संदेश देणारा पोस्टर, मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या टी-शर्टवरील विशेष मेसेज आणि पारंपरिक पोशाखातील कोळी बांधवांचे बँड पथक रॅलीचे मुख्य केंद्र ठरले.