डोनाल्ड ट्रम्प यांना होर्मुझ मोहिमेतून माघार घ्यायला लावणारी 'ती' व्यक्ती अखेर कोण आहे?
मुंबई (प्रतिनिधी) : अमेरिका-इस्रायलनं इराणविरोधात युद्धाला सुरुवात करून आज ३३ दिवस झालेत. त्यात स्ट्रेट होर्मुझ मोहिमेवरून डोनाल्ड ट्रम्प यांनी माघार घेतली आहे. होर्मुझबाबत अमेरिकेला देणे घेणे नाही. ज्या देशांना तेल हवंय, त्या देशांनी स्वत: बघावे. आम्ही इराण युद्धातून बाहेर पडण्याची तयारी करत आहोत असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अमेरिकेने ५० हजाराहून अधिक सैनिक मध्य पूर्वेत तैनात केले आहेत. होर्मुझवर नियंत्रण मिळवण्यासाठी कमीत कमी ३ राऊंड बैठका झाल्या आहेत. मग अचानक ट्रम्प यांनी होर्मुझवरून प्लॅन का बदलला? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

१६ मार्च रोजी राष्ट्रपती ट्रम्प यांनी ओवल ऑफिसमध्ये संरक्षण मंत्री पीट हेगसेथ आणि सुरक्षा सल्लागार जनरल केन यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत ट्रम्प यांनी केन यांना अखेर आपण सैन्य होर्मुझमध्ये का पाठवत नाही, इराणने होर्मुझ मार्ग कसा ब्लॉक केला असे प्रश्न विचारले. त्यावर केन यांनी ट्रम्प यांना संपूर्ण आढावा दिला. याठिकाणी ताकदीने कब्जा केला जाऊ शकत नाही. इराणने अत्यंत हुशारीने आपले सैन्य तिथे तैनात केलंय. एका किरकोळ नौकाही अमेरिकन युद्धनौकेला बर्बाद करू शकते असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, ५७ वर्षीय जनरल केन हे अमेरिकेचे लष्करी सल्लागार आहेत. ते राष्ट्रपती ट्रम्प यांचे सल्लागार आहेत. ते जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे प्रमुख आहेत आणि अमेरिकेतील एक फोर-स्टार जनरल देखील आहेत. केन हे इराण युद्धाचे विरोधक मानले जातात. केन यांनी सुरुवातीला इराण युद्धाला विरोध केला होता परंतु स्टीव्ह विटकॉफ आणि पीट हेगसेथ यांच्या प्रभावामुळे ट्रम्प यांनी इराणवर हल्ला चढवला.




