दिल्ली आंदोलनाचा व्हिडिओ शेअर करत राहुल गांधींची न्यायाची मागणी; पेलेट गन प्रकरणी स्वतंत्र चौकशीची मागणी
मुंबई (प्रतिनिधी) : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 20 जुलै रोजी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पेलेट गनच्या वापरावर प्रश्न उपस्थित करत विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर त्यांनी आंदोलनातील एक व्हिडिओ शेअर करत सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र उच्चाधिकार समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली.

आपल्या पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे, विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र उच्चाधिकार समिती स्थापन केली पाहिजे.
दरम्यान, आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या 25 वर्षीय शेख इरशाद मन्सूरी यांच्या वैद्यकीय-कायदेशीर (MLC) अहवालातील काही तपशील समोर आले आहेत. अहवालानुसार, शस्त्रक्रियेदरम्यान त्यांच्या डोक्याच्या, मानेच्या, चेहऱ्याच्या आणि शरीराच्या इतर भागांतून अनेक धातूचे कण काढण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजच्या 24 जुलैच्या अहवालानुसार, 21 जुलै रोजी जनरल अॅनेस्थेशियाखाली शस्त्रक्रिया करून शरीरात अडकलेले बाह्य कण काढण्यात आले. तसेच डाव्या डोळ्याजवळील ऑर्बिटल भागातूनही एक धातूचा कण काढण्यात आल्याची नोंद आहे.
शेख इरशाद मन्सूरी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या शरीरातून एकूण सात धातूचे कण काढण्यात आले असून, काही कण अजूनही चेहऱ्याजवळ असल्याचा त्यांचा दावा आहे. या पार्श्वभूमीवर पेलेट गनच्या वापराबाबतचा वाद अधिक तीव्र झाला असून, या प्रकरणी न्यायालयीन आणि प्रशासकीय स्तरावर पुढील घडामोडींकडे लक्ष लागले आहे.




