दुष्काळाची दाहकता! बुलढाण्यासह पावसाने दडी मारलेल्या भागात कृत्रिम पावसाचा प्रयोग करा; प्रतापराव जाधवांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

दुष्काळाची दाहकता! बुलढाण्यासह पावसाने दडी मारलेल्या भागात कृत्रिम पावसाचा प्रयोग करा; प्रतापराव जाधवांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी विश्रांती घेतली असून, त्याचा थेट परिणाम आता शेतकऱ्यांच्या पिकांवर होत आहे. मराठवाड्यावरही दुष्काळाचं संकट गडद होताना दिसत आहे. धाराशिव जिल्ह्यात लाखो हेक्टरवर पेरणी केलेलं सोयाबीन पावसाअभावी करपून गेलं आहे. तर राज्यातील इतर भागातही दुष्काळाची दाहकता आता जाणवू लागली आहे.

 दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील ज्या भागात पावसाने दडी मारली आहे, तिथे अनुकूल हवामान असल्यास कृत्रिम पर्जन्य अर्थात ‘क्लाउड सीडिंग’चा प्रयोग तातडीने राबवावा, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. 5 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून त्यांनी कृत्रिम पावसाच्या प्रयोगाबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.

 बुलढाणा जिल्ह्यात पावसाचं प्रमाण सामान्यापेक्षा सुमारे 87 टक्के कमी असल्याचं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. पावसाअभावी खरीप पिकांवर मोठं संकट निर्माण झालं आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता IMD, IITM आणि संबंधित तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कृत्रिम पर्जन्य प्रयोगाची तांत्रिक व्यवहार्यता तपासून त्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रतापराव जाधव यांनी केली आहे.

 दरम्यान, वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील अमानवाडी परिसरात गेल्या महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकं धोक्यात आली आहेत. यामध्ये सर्वाधिक फटका सोयाबीन पिकाला बसताना दिसत आहे. आता सोयाबीनची पिकं करपण्यास सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांना उभ्या पिकांचं नुकसान डोळ्यादेखत पाहावं लागत आहे. पावसाचा मोठा खंड पडल्याने सोयाबीनची पाने पिवळी पडली आहेत. कळ्या आणि शेंगा गळून पडू लागल्या असून झाडं आतून पूर्णपणे सुकत आहेत.

 हळदीच्या वाढीवरही परिणाम झाला आहे. तर तूर आणि कपाशीची पिकंही पाण्याअभावी माना टाकू लागली आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिकं वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. अमानवाडीसह संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी आता दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, परभणीच्या जिंतूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मेंढपाळाच्या कळपातील तब्बल 44 मेंढ्यांचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

 या घटनेमुळे मेंढपाळाचं मोठं आर्थिक नुकसान झालं असून, मेंढ्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे. नुकसानग्रस्त मेंढपाळाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणीही करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. मृत मेंढ्यांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर या मेंढ्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.

 जिंतूर तालुक्यातील वडाळी येथे मेंढपाळ पुनाजी येळे हे आपल्या कुटुंबासह 300 हून अधिक मेंढ्या घेऊन मुक्कामी होते. यावेळी त्यांच्या कळपातील एकापाठोपाठ तब्बल 44 मेंढ्या अचानक दगावल्या. दूषित चारा, विषबाधा किंवा संसर्गजन्य आजार यापैकी नेमक्या कोणत्या कारणामुळे मेंढ्यांचा मृत्यू झाला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने मेंढ्या दगावल्याने मेंढपाळाचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.