पारंपरिक लावणीच्या नावाखाली अश्लील DJ लावणीला लगाम कधी? राष्ट्रवादीचं फडणवीसांना पत्र, नेमकं काय घडलं?
पुणे (प्रतिनिधी) : पारंपरिक लावणीच्या नावाखाली सुरू असलेल्या अश्लील DJ लावणी आणि नृत्याच्या कार्यक्रमांवर नियंत्रण कधी आणणार? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाने उपस्थित केला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही देण्यात आलं आहे. दहीहंडी उत्सवात अश्लील नृत्य करणाऱ्या कलाकारांवर कारवाई होणार का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचं प्रमाणपत्र न घेतलेल्या कलाकार आणि कार्यक्रमांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने अश्लील नृत्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. शासनाने रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या माध्यमातून कार्यक्रमांच्या पूर्वपरिनिरीक्षणाबाबत स्पष्ट आदेश काढले आहेत. या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी सादर होणारे नाटक, एकांकिका, लोकनाट्य, तमाशा, लावणी, लोकसंगीत, वग, मेळे आदी कार्यक्रमांसाठी संबंधित कार्यक्रमाची संहिता, निवेदन किंवा सारांश तपासून मंडळाचं योग्यता प्रमाणपत्र घेणं आवश्यक आहे.
मात्र शासनाने आदेश काढूनही त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसेल, तर या आदेशाचा उपयोग काय? असा सवाल राष्ट्रवादीच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाने उपस्थित केला आहे. महाराष्ट्रातील कला, लोककला, चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्राची प्रतिष्ठा जपण्यासाठी गेल्या तीन-चार वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं आहे. विशेषतः पारंपरिक लावणीच्या नावाखाली सुरू असलेल्या अश्लील DJ लावणी आणि नृत्य कार्यक्रमांवर नियंत्रण आणण्याची मागणी वारंवार करण्यात आली आहे.
दरम्यान, अलीकडील दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये काही ठिकाणी गौतमी पाटील, राधा पाटील तसेच इतर यूपी आणि बिहारमधील महिला कलाकारांच्या कार्यक्रमांमध्ये अश्लील नृत्यप्रकार सादर झाल्याच्या तक्रारी आणि दृश्यफिती समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. काही ठिकाणी महाराष्ट्राबाहेरील कलाकारांनाही अश्लील स्वरूपाच्या कार्यक्रमांसाठी आणण्यात आल्याचंही निदर्शनास आलं आहे.
या कार्यक्रमांना रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचं योग्यता प्रमाणपत्र होतं का? कार्यक्रमाची संहिता किंवा निवेदन पूर्वपरिनिरीक्षणासाठी मंडळाकडे सादर करण्यात आलं होतं का? तसेच शासनाच्या आदेशानुसार आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का? असे सवाल राष्ट्रवादीने उपस्थित केले आहेत.
संबंधित पोलीस प्रशासनाने या प्रश्नांची उत्तरं जनतेसमोर स्पष्ट करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. शासनाचा आदेश लागू झाल्यानंतरही अशा कार्यक्रमांना परवानगी दिली जात असेल, तर मुंबई आणि ठाणे पोलीस आयुक्तांनी आदेशाची अंमलबजावणी केली आहे की नाही, याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शासनाचा आदेश कोणत्याही व्यक्तीपेक्षा मोठा आहे, असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. दहीहंडी उत्सव कोणत्याही मोठ्या राजकीय नेत्याचा, आमदार, खासदार किंवा मंत्र्यांचा असला तरी शासनाचा आदेश सर्वांसाठी समान असायला हवा. कोणत्याही राजकीय, सामाजिक किंवा आर्थिक दबावाखाली आदेशाची अंमलबजावणी थांबवता येणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीने मांडली आहे.
मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये झालेल्या संबंधित कार्यक्रमांची चौकशी करून शासनाच्या आदेशाचं पालन झालं होतं की नाही, याची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालावं, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाने केली आहे.
दरम्यान, सोलापूरच्या भोगाव परिसरातील एका ऑर्केस्ट्रा बारवर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अश्लील नृत्य करणाऱ्या 15 महिलांसह 26 ग्राहकांवर कारवाई करण्यात आली आहे. या ऑर्केस्ट्रा बारमध्ये महिला तोकडे कपडे घालून अश्लील हावभाव करत नृत्य करत असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर रविवारी रात्री सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने छापा टाकला. या कारवाईदरम्यान तब्बल 28 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.




