‘देऊळ बंद 2’च्या सेटवरचे खास क्षण; प्रवीण तरडेंच्या पत्नीची भावनिक पोस्ट चर्चेत
मुंबई (प्रतिनिधी) : प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद 2-आता परीक्षा देवाची' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. मोहन जोशी अभिनीत या सिनेमात स्नेहल तरडे यांचीही मुख्य भूमिका आहे. 'देऊळ बंद' या सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. तब्बल 11 वर्षांनंतर या सिनेमाचा सिक्वेल रिलीज झाला आहे. या सिनेमात अध्यात्म, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि महिलाशक्ती हे तिन्ही मुद्दे केंद्रस्थानी आहेत.या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळत असलेले प्रेम पाहून प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडे भारावून गेले आहेत. हा सिनेमा रिलीज होऊन एक आठवडा पूर्ण झाला आहे. यानिमित्त स्नेहल तरडे यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

'देऊळ बंद 2' ला मिळत असलेल्या यशानंतर स्नेहल तरडे यांनी इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी 'देऊळ बंद 2'च्या सेटवरील प्रवीण तरडे यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना त्यांनी एक भावनिक आणि सुंदर कॅप्शन दिलं आहे. 'तू, मी अन् देऊळ बंद 2. हा सिनेमा प्रदर्शित होऊन एक आठवडा पूर्ण झाला. सिनेमाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून खूप आनंद झाला. तू अन् मी, एकाच कलेच्या प्रेमात असणारी दोन माणसं!'
'स्वामींनी आपल्याला एकत्र आणलं. त्यात आपलं एकमेकांवर असलेलं प्रचंड प्रेम. तसेच आपलं आपल्या कलेवर असलेलं प्रेम. या दोन्ही गोष्टींची गुंफण घालून काहीतरी वेगळं साध्य करुन घ्यायचं होतं. आपलं निमित्त करुन अनेक सामाजिक प्रश्न, शेतकर्यांच्या समस्या, देवावर वाढत असलेली अश्रद्धा अशा अनेक गोष्टी अधोरेखित करुन त्यावरचे उपाय समाजाला सांगायचे होते'.
'निर्मात्यांना चित्रपटातून मिळणारा नफा आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या मुलींच्या थांबलेल्या शिक्षणावर खर्च करण्याची बुद्धी देऊन, त्यांच्या स्त्रियांना आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी मदत करायची होती स्वामींना..योग्य वेळ साधून सगळं काही घडवून आणलंय त्यांनी! त्यांच्या या एवढ्या मोठ्या कृपेचे आपण पात्र ठरलो आहोत, हे आपले केवढे मोठे भाग्य म्हणायचे! स्वामी महाराज, तुमची अशीच कृपा जन्मोजन्मी आमच्या भाग्यात येवो हीच तुमच्या चरणी प्रार्थना.श्री स्वामी समर्थ महाराज की जय', असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.




