देवेंद्र फडणवीसांचं केंद्रात वजन वाढणार: मोठी जबाबदारी खांद्यावर येणार?
मुंबई (प्रतिनिधी) : दिल्लीतील जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलनामुळे गेल्या 12 वर्षांत पहिल्यांदाच सत्तेला हादरा बसल्यानंतर आता भाजपने राष्ट्रीय पातळीवर गंभीरपणे विचारमंथन आणि आवश्यक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून लवकरच भाजपच्या पक्षसंघटनेची सर्वोच्च समिती असणाऱ्या संसदीय मंडळात काही बदल केले जाऊ शकतात. यावेळी महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश भाजपच्या संसदीय मंडळात होऊ शकतो.

यापूर्वी नितीन गडकरी हे भाजपच्या संसदीय मंडळात होते. मात्र, ते संसदीय मंडळातून बाहेर झाल्यानंतर महाराष्ट्राचा एकही नेता या समितीत नव्हता. त्यामुळे आता भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांना संसदीय मंडळात संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी अलीकडेच भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली होती. त्यानंतर आता भाजपच्या संसदीय मंडळात बदल अपेक्षित आहेत. नितीन नवीन यांच्याकडून लवकरच यासंदर्भात घोषणा केली जाऊ शकते. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर असल्याचे मानले जात आहे.
तीन निवडणुकांत भाजपला 100 प्लस जागा मिळवून देणारे देवेंद्र फडणवीस हे एकमेव मुख्यमंत्री असल्याचा दावा केला जात आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे केंद्रातील देवेंद्र फडणवीस यांचे वजन वाढले आहे. त्यामुळेच त्यांना भाजपच्या संसदीय मंडळात स्थान मिळू शकते, अशी चर्चा आहे. फडणवीसांच्या या नियुक्तीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून देवेंद्र फडणवीस दिल्लीला केंद्र सरकारमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस हे नवे शिक्षणमंत्री होतील, असेही सांगितले जात होते. मात्र, देवेंद्र फडणवीस हे वारंवार आपण महाराष्ट्रातच राहणार असल्याचे सांगत आहेत. तरीही फडणवीसांच्या दिल्लीला जाण्याच्या चर्चा थांबलेल्या नाहीत. अलीकडच्या काळात त्यांच्या दिल्लीच्या वाऱ्याही वाढल्या आहेत.
संसदीय मंडळ ही भाजपची सर्वोच्च आणि महत्त्वाची समिती मानली जाते. भाजपच्या निर्णयप्रक्रियेत संसदीय मंडळाचा प्रमुख वाटा असतो.भाजपच्या या संसदीय मंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह यांच्यासह एकूण 12 जणांचा समावेश आहे. गेल्या काही काळात एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला संसदीय मंडळात नियुक्त करण्याचा प्रघात भाजपमध्ये पडला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून यावेळी देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे.
देवेंद्र फडणवीस संसदीय मंडळात गेल्यास त्यांचे स्वतःचे आणि महाराष्ट्राचे केंद्रातील वजन आणखी वाढू शकते. देवेंद्र फडणवीस भविष्यात केंद्राच्या राजकारणात जातील, अशी चर्चा महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कायम असते. त्यामुळे संसदीय मंडळातील संभाव्य नियुक्ती ही त्याची पहिली पायरी असावी का, याबद्दल सध्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.




